बांधकाम विभागातील ठेकेदार वर्गात खळबळ
बनावट नोंदणी प्रमाणपत्र प्रकरणी ४२० चा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माळशिरस नगरपंचायतसमोर ६ मे रोजी ठिय्या आंदोलन
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
५९ फाटा कॅनॉल ते चौगुलेवस्ती रस्त्याच्या कामाची चौकशी करून बनावट नोंदणी प्रमाणपत्र देऊन काम मिळविणाऱ्या ठेकेदारावर प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित ठेकेदारावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे उपस्थित होते.माळशिरस नगरपंचायतच्या अंतर्गत ५९ फाटा ते चौगुलेवस्ती या रस्त्याचे काम करण्यात आले आहे.हे काम बांधकाम विभागामार्फत काढण्यात आलेल्या निवेदेमधील अटी,शर्ती,नियम याचा भंग करून व सर्व नियम धाब्यावर बसवून करण्यात आले आहे.या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. संबंधित कामामध्ये वापरलेले मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे असल्याची शक्यता असून संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे,अशी तक्रार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.हे काम गुणवत्तापूर्वक झाले नाही. या कामामध्ये वापरलेले मटेरियल हे शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासले नसल्याची शक्यता आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने कार्यालयाकडे निविदा प्रक्रिया पूर्ण करताना खोटी माहिती देऊन त्यांच्या मे.बाबा कन्स्ट्रक्शन नावाने असलेल्या व प्रो.प्रा.संजय बाबुराव मोटे रा.कोथरूड पुणे ३८ यांनी नोंदणी न केलेले पत्र जोडून आपल्या कार्यालयाकडून काम मिळविले असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार यांनी ज्या कन्स्ट्रक्शनच्या नावाने निविदा भरली होती व काम मिळविले होते,त्याची चौकशी करून संबंधित कन्स्ट्रक्शन बनावट असल्यास या कन्स्ट्रक्शन धारकावर ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, संबंधित कन्स्ट्रक्शनने निविदा भरत असताना त्याची पडताळणी न करता निविदा पास करणाऱ्या जबाबदार अधिकारी याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत संबंधित कामाचे बिल अदा करण्यात येवू नये,अशी मागणी करून गुरुवारी दिनांक ६ मे रोजी माळशिरस नगरपंचायतच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे