कोरोनाचा काळ आलाय बाका,प्रशासन मात्र झाडतंय काखा!

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: 

रूग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्णसंख्या ही जतकरांना चिंतेची बाब ठरत असल्याने जत शहर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करावे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.   जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे.विकेंड लाॅकडाऊननंतर तर जत शहरात लोकांची मोठी गर्दी होत असते.त्यामुळे कोरोना रूग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे.    जत पोलीस प्रशासन फक्त नावापुरतीच कारवाई करताना दिसत आहे.मागील लाॅकडाऊन वेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी जतकरांमध्ये चांगली शिस्त निर्माण केली होती.सद्याची संचारबंदीची वेळ सकाळी सात ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असली तरी जत शहरात मात्र अकरानंतरही व्यावसाईक आपली दुकाने चोरून सुरू ठेवल्याचे पहायला मिळत आहेत.  जतची नगरपरिषद ही फक्त नावालाच असून कोरोना काळात नगरपरिषदेचे कामकाज झीरो आहे.या पालिकेकडून कोरोना प्रतिबंधात्मक कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत, हे जतकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.   जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई हे जत नगरपरिषदेतील राजकारणाला वैतागून वैद्यकिय रजेवर गेले आहेत.सद्या प्रभारी मुख्याधिकारी काम पाहत आहेत, पण त्यांच्याकडूनही कोरोनाचे कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. हे असेच सुरू राहिले तर लवकरच जत शहरात कोरोना बाधितांची मोठी संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही.     जत शहरातील महसुल प्रशासन व आरोग्य प्रशासन यांच्याकडूनही कोरोना सबंधित योग्य त्या उपाययोजना होताना दिसत नाहीत.जत ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये अस्वच्छता पहावयास मिळत आहे. या ठिकाणी असलेले अधिकारी व कर्मचारी यांचे कोविड रूग्णांकडे दुर्लक्ष होत आहे.या ठिकाणी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन बेडची व व्हेंटीलेटरची व्यवस्था नाही.कोरोनासाठी रामबाण असलेले रेमडीसिवीर इंजेक्शनची उपलब्धता नाही. त्यामुळे येथील रूग्णांची अवस्था रामभरोसे अशी झाली आहे.     त्यातच जत शहरासह तालुक्यातील होमआयसोलेशनमध्ये असलेले कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण हे बाहेर फिरत असून या रूग्णांवर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे जत शहरातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासाठी तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद यांनी कडक भूमिका घ्यावी व कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना राबवाव्यात.  त्याचप्रमाणे जत नगरपरिषदेने  स्वत:चे एक कोविड सेंटर उभे करावे व एक  शववाहिका खरेदी करावी अशी मागणीही केली आहे.   यामुळे  जत शहरासह तालुक्यातील कोरोनाचे संकट दूर होईल अशी अपेक्षा ही चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी व्यक्त केली आहे.