सनमडी आश्रमशाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

सनमडी येथील महात्मा ज्योतिराव फुले प्राथमिक आश्रमशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व श्री. उमाजीराव सनमडीकर (काका) आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आश्रमशाळा पालक समितीचे अध्यक्ष गोरख काळे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी शालेय विद्यार्थी यांच्या झांज पथकाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्काऊट, गाईड व आर.एस.पी पथकाद्वारे संचलन करून पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच मल्लखांबाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याने करून दाखवले.
सन- 2020- 21 या शैक्षणिक वर्षांमध्ये भाषण स्पर्धा ,कबड्डी, धावण्याच्या स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा,पाढे पाठांतर, इंग्रजी शब्द पाठांतर,हस्ताक्षर चित्रकला स्पर्धा ,संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धांचेे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. त्याचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, मुख्याध्यापक व पालक यांच्या हस्ते करण्यात आले.
आदर्श विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा उत्कृष्टप्रमाणे शाळा सुरू आहे, मल्लखांबासारखे दुर्मिळ खेळ या शाळेने जतन केलेले आहेत,याचे कौतुक केले. ही शाळा पाहिल्यानंतर मला असे वाटते की मी पुण्यामधील एखाद्या शाळेमध्येच आहे.तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना केले.
या कार्यक्रमासाठी सनमडी गावचे तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक ,माडग्याळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पाटील, जगधने ,पालक, विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत एम.डी. यांनी केले व कार्यक्रमाचे आभार पुजारी आर.डी यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन उमाजीराव सनमडीकर,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर व संचालिका सौ. डॉ. वैशाली सनमडीकर यांचे मार्गदर्शन लाभले.