…तर जत तालुकाच बनेल कोरोनाचा हाॅटस्पाॅट? लॉकडाऊनची शक्यता!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

गत चार दिवसातच जत शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही शंभरी पार झाली आहे. तर कोरोनाने दोन जणांचा बळी घेतला आहे. जत तालुक्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असतानाही तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांना याचे कोणतेच गांभीर्य दिसत नाही, असे जर चालू राहिले तर जत तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाल्याशिवाय राहणार नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन व जत नगरपालिका यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने तालुकावासियांची चिंता वाढली आहे.जत तालुक्यात आजपर्यंत २४१५ जनांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी २१६३ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे तालुक्यातील ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सद्या १७५ रूग्ण हे उपचाराखाली आहेत. होमआयसोलेशनमध्ये उपचार घेणारे रूग्ण १४४ आहेत,तर ११ जण जत कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मिरज व सांगली येथे उपचारासाठी गेलेले रूग्ण २० आहेत.
जत तालुक्यातील बिळूर हे गांव कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले होते. त्यानंतर तालुक्यातील आवंढी हे गाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले होते. आता काशिलिंगवाडी हे गांव कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे. तर जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत होत असलेल्या नागरिकांच्या तुफान गर्दी, वाहतूक कोंडी व कोरोनाचे पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करण्याकडे होत असलेल्या पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जत शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहेत. जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत विविध प्रकारचे व्यवसाय करणारे व्यवसायिक हे कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन करताना दिसत नाहीत. या व्यवसायिकांच्या तोंडाला मास्क लावलेले नसतात. तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात येत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत तर हे व्यवसायिक पूर्णपणे बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.
जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार तालुका प्रशासन अधिकारी, पोलीस प्रशासन अधिकारी व जत नगरपरिषद यांना असतानाही ते याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकही बेफिकीरीने वागत असून याचा परिणाम कोरोना वाढीवर होत आहे. जत शहरात गत आठ दिवसात राजकिय नेते, जिल्हा परिषद सदस्या,अडत व्यापारी, कापड व्यापारी, सराफ व्यावसायिक तसेच वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या कोरोना पाॅझिटीव्ह आढळून येत असून येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे या कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांना होमआयसोलेशनमध्ये ठेवत आहेत. परंतु होमआयसोलेशनमध्ये असलेले बहुतांशी रूग्ण हे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करताना दिसत नाहीत. यापैकी बहुतांशी रूग्ण हे पाॅझिटीव्ह असतानाही शहरात फिरताना दिसत आहेत ही गांभीर्याची बाब आहे.
यापूर्वी जत शहरासह तालुक्यात कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद ही योग्य ती खबरदारी घेत होते. परंतु अलिकडे या यंत्रणा आपआपली जबाबदारी पार पाडण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे याचा परिणाम जत शहरासह तालुक्यात कोरोना वाढ होण्यासाठी होत आहे. आरोग्य विभागाचे वतीने जत शहरासह तालुक्यातील जत व माडग्याळ येथील ग्रामीण रूग्णालयात तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात पंचेचाळीस वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधासाठी लस देण्यात येत आहेत.
जत शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांची वाढती रूग्ण संख्या विचारात घेऊन आरोग्य विभाग व प्रशासनाने जत तालुक्यात ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटरची त्वरित व्यवस्था करावी व कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा जत शहर व तालुकावासियांतून करण्यात येत आहे.