महाविकास आघाडी सरकारच धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देणार:- प्रा.नारायण खरजे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
धनगर समाजाचे प्रश्न सोडविणे राहिले बाजूला आणि समाजातीलच काही लोकांनी समाजाची दिशाभूल करणे बरोबर नाही,असे करणाराला समाज माफ करणार नाही, असे मत युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रचे प्रदेश सचिव प्रा.नारायण खरजे यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले,प्रत्येक सामाजिक, राजकीय लढ्यात प्रामाणिकपणे काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मत घेणे कोणालाही आवश्यक वाटताना दिसत नाही. गेली बरेच वर्षे समाजाचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून २०१४ ला महायुतीचे सरकार आले, असे राजकीय विश्लेषकांनी व पदाधिकारी यांनी याअगोदरच स्पष्ट सांगितले आहे. परंतु ज्या फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये समाजाचे सर्व प्रश्न सोडविणार असे बारामतीमध्ये आश्वासन दिले, त्यांनी तर अक्षरश: समाजाचा भ्रमनिरास केला. तसेच सत्ताकाळात राज्यसरकारच्या हातात धनगर आरक्षणाचा विषय नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेकवेळा सांगितले आहे.त्यामुळे समाजालाही भूलथापा देण्याचे काम मागील सरकारने केले आहे, अशी समाजाची तीव्र नाराजीची भावना झाली होती.
गेली बरीच वर्षे समाजाचे असंख्य प्रलंबित प्रश्न आहेत. परंतु आपापल्या श्रेयवादासाठी मी केले का, तु केले? या श्रेयवादासाठी कोणच कोणाला सहकार्य करण्याची भावना व्यक्त करताना सद्यस्थितीत तर दिसत नाही. जर खरच समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो असे म्हणतात, त्यांनी तरी निदान योग्य मार्गावर, योग्य ठिकाणी समाजाचे प्रश्न मांडणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले,अनेक जानकारांच्या मते २०१४ ला राज्यातील सरकारला पायउतार व महायुतीच्या सरकारने भ्रमनिरास केल्याने आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारकडून धनगर समाजाच्या प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल असे दिसत आहे.म्हणूनच भाजपकडून काही लोकांना पुढे करून, समाजाच्या लोकांची माथी भडकावून समाजाची कामे होऊ द्यायचे आहेत की नाही? अशी शंका समाजातील लोकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सुशिक्षित, समाजाच्या प्रश्नांची जान असलेल्या व प्रत्येक आंदोलनात समाजाची कशी फसवणूक झाली याचे पुराव्यानुसार वर्णन करणारे बरेच काही पुढील काळात समाजमाध्यमासमोर, प्रसारमाध्यमांसमोर मांडणी केली जाणार आहे, परंतु समाजातील प्रश्न सुटणे काळाची गरज आहे. ती ओळखून समाजाचे प्रश्न कसे सुटतील? याकडे जरा बारकाईने बघणे गरजेचे आहे. राज्य सरकार नक्कीच समाजाच्या प्रश्नावरती होकारार्थी दिसत आहे, काही प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.उदा. १.जिल्हानिहाय शासकीय कमिटीवर समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देणे.
२. मेंढपाळ बांधवांच्या समस्येवर कायदा तयार करणे व राज्यभरातील मेंढपाळ बांधवांना शासकीय अनुदान देणे
३. जिल्हानिहाय MPSC/UPSC केंद्र व विद्यार्थ्यांना मोफत निवासी होस्टेलची सोय उपलब्ध करून देणे.
४. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे व समाजातील ध्येय वादी तरूणांना नवनवीन उद्योग-व्यवसाय करण्यासाठी सरकारी बँकेमार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे. आदि अनेक प्रश्नांची उकल राज्यसरकार येत्या दिवसांत करीत आहे, असे स्पष्ट संकेत वेगवेगळ्या मिटींगमध्ये दिले आहेत. नक्कीच या महाविकास आघाडी सरकारने अजूनही कोणत्याही विरोधकांच्या टीकांकारावरती लक्ष न देता धनगर समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना नजरेसमोर ठेवून समाजातील प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा, समाजातील कामांची दखल समाज नक्कीच घेतो,असे स्पष्ट मत प्रा.नारायण खरजे यांनी व्यक्त केले.