अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
रासपचे संस्थापक व माजी मंत्री महादेव जानकर यांचे विश्वासू व कट्टर समर्थक म्हणून जिल्ह्याला परिचित असणारे अजितकुमार पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रत्नाकर गुट्टे ,मुख्य महासचिव व राजमाता अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडताडे यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत ही निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
रासपच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी आटपाडी येथील लक्ष्मण सरगर व जत येथील आप्पासो थोरात यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. नूतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी रासपचे २००८मध्ये जत शहराध्यक्ष, २०१०मध्ये विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष, २०१२ मध्ये युवा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष,२०१४ मध्ये जिल्हाध्यक्ष या पदावर काम केले आहे. या १२ वर्षाच्या कालावधीत पक्षीय पातळीवर विविध प्रश्नांवर आंदोलन करीत पक्षसंघटना वाढविण्यासाठी परिश्रम घेतले. याची पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घेत त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदाची जबाबदारी
सोपवली आहे.त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवडीनंतर पाटील म्हणाले,रासपचे संस्थापक व माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या या विश्वासाला पात्र राहून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन