कोण मारणार बाजी?कोण बॅकफुटवर जाणार?

जत तालुक्यात स्थानिक गटांमध्ये होणार चुरशीची लढाई !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुका स्थानिक पातळीवर होताना पाहायला मिळत आहेत. यात अनेक ठिकाणी परंपरागत गट काँग्रेस आणि भाजप आमने-सामने येत आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुका देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवा अशा प्रकारची घोषणा केल्याने या पॅटर्नचा प्रभाव निवडणुकीत पडणार का?हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
     स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे.तालुक्यात काँग्रेसचे प्राबल्य असताना महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात काँग्रेस संमत होणार का? आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये संधी देणार का? हा मोठा प्रश्न आहे.आजपर्यंत गाव पातळीवर भाजप आणि काँग्रेस या दोन गटातच निवडणुका होत होत्या. यंदा मात्र तालुक्यात हे समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी तालुक्यात गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पॅनेल तयार करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी सध्या गाव पातळीवरील नेते व कार्यकर्ते पुढे आले आहेत.
    तालुकास्तरीय नेते ग्रामपंचायत निवडणुकीत फारसे लक्ष घालत नसतात. गावपातळीवरील स्थानिक कार्यकर्त्यांमध्येच निवडणुका होत असतात. त्यामुळे शक्यतो गावपातळीवरील निवडणुकीत राजकीय रंग खेळताना दिसून येत नाही. मात्र शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसचे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुकीत उतरणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. जत तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य कमी आहे. डोर्लीसारख्या गावात भाजपा व मनसे एकत्रित येऊन कॉंग्रेसच्या विरोधात टक्कर लागणार आहे. 
   जत हा भाजप व काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने आजपर्यंत तालुक्‍यात दोन गटातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चुरशीच्या होताना दिसून आले आहेत. परंतु यंदाचे महाविकासआघाडी समीकरण पाहता तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार का ?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून भाजप व महाविकास आघाडी करीता ही प्रतिष्ठेची लढाई असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे भाजप व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्तेसाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जाते. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या रणांगनात कोण मारणार बाजी, आणि कोण बॅकफुटवर जाणार1 हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट!
जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा सगळ्यात मोठा टप्पा आहे.आता या टप्प्यामध्ये किती ग्रामपंचायत होतात आणि किती ठिकाणी निवडणुका लागतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणूक लागलेल्या गावात महाविकास आघाडीचा पॅटर्न कितपत लागू पडतो? हे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच ठरणार आहे.