नव्या कारभाऱ्यांसाठी ३० गावांत निवडणूकींचा तवा तापलाय लालेलाल!

अनिल मदने 
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: 

जुलै-ऑगस्टमध्ये मुदत संपलेल्या जत तालुक्यातील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तात्काल आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच राजकीय पक्षांकडून या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच आरक्षित प्रभागातील जागांवर उमेदवारांची शोधाशोध आणि जात प्रमाणपत्र काढण्यासाठीची लगबगही झाली आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून तेव्हापासून खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
      ग्रामपंचायत निवडणूक कधी होणार? कधी होणार? ही प्रतीक्षा आता संपली असून निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 18 जानेवारीतारखेला मतमोजणी होणार आहे. नवीन वर्षात या सर्व ग्रामपंचायतीवर नवे राज्य येणार आहे.यामध्ये तालुक्यातील मुदत संपलेल्या 30 ग्रामपंचायतीसाठी राजकीय सामना रंगणार आहे .तालुक्यातील शेगाव,गुड्डापुर,सनमडी,वळसंग,उटगी,अंकलगी,अंकले,भिवर्गी,धावडवाडी,डोरली,घोलेश्वर,जालिहाळ खुर्द,करेवाडी(ति),कुडनुर,कुलाळवाडी,लमाणतांडा,दरीबडची,मेंढेगिरी,मोरबगी,निगडी बुद्रुक, शेड्याळ,शिंगणहळळी,सोनलगी,तिकोंडी टोणेवाडी, उमराणी,उंटवाडी या गावात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.