आंदोलनावेळी विक्रम ढोणे यांनी दिली महिनाभराची मुदत
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ आरक्षणाची तरतूद तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने केल्याचे जाहीर विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यापार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाच्या तरतुदीसंबंधीची कागदपत्रे सात दिवसांत सादर करावीत,असे आव्हान धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटील पुरावे देवू शकले नाहीत, त्यामुळे जतमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले.
दि. 21 नोव्हेंबर, 2020 रोजी पुण्यातील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला ‘एसटी- बी’ आरक्षणाची तरतूद केल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर लगेचच धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी चंद्रकांत पाटील हे समाजाची दिशाभूल करीत असल्याची जाणीव करून दिली होती.तसेच चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणासंबंधीची कागदपत्रे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावीत. यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देत जत तहसिलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलनाची घोषणा त्यांनी केली होती.
दरम्यानच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही, तसेच कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे जत तहसिल कार्यालयाबाहेर आंदोलन करून चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला.
विक्रम ढोणे म्हणाले,आजवर सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. राजकीय नेते सातत्याने खोटे बोलत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी तर खोटे बोलण्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. धनगर एसटी आरक्षणासंबंधी तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने काडीचेही काम केलेले नाही, हे सर्वांना माहिती आहे. तरीही फडणवीसांनी एसटी-बी प्रवर्गाची व्यवस्था केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला ती कागदपत्रे बघायची आहेत. धनगर समाजाचे होणारे शोषण थांबवायचे आहे. म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान दिले होते, मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही. यातूनच त्यांचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे. आता आमचे भाजप पक्ष संघटनेला आव्हान आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच त्यांच्या आमदार खासदारांनी यासंदर्भाने कागदपत्रे सादर करावीत. यासाठी आम्ही महिनाभराची मुदत देत आहोत,असे विक्रम ढोणे म्हणाले.
या आंदोलनात नाथा पाटील, रमेश कोळेकर, किसन टेंगळे, अतुल शिंदे, युवराज खांडेकर, ज्ञानेश्वर वगरे, महांतेश पाटील, रवी कित्तुरे, बाळू मासाळ, विलास सरगर, तात्या खांडेकर, सचिन लोखंडे, मल्लाप्पा करे, आपासो खांडेकर, शशिकांत कित्तुरे उपस्थित होते.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन