राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तालुक्यातील पदवीधर अग्रेसर राहतील:ज्येष्ठ नेते रावसाहेब(काका)पाटील

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
पदवीधर संघटना ही बुद्धिजीवी लोकांची संघटना असून ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी संघटना आहे म्हणून सर्वत्र ओळखली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या कामी आटपाडी तालुक्यातील पदवीधर अग्रेसर राहतील, असे उद्गार आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील यांनी पदवीधर संघटनेच्या अध्यक्ष निवडीच्या प्रसंगी बोलताना काढले.
आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आटपाडी येथे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. याप्रसंगी तालुका पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र आवळाईचे राष्ट्रवादीचे पदवीधर कार्यकर्ते हणमंतराव चव्हाण यांना ज्येष्ठ नेते रावसाहेब(काका) पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, पदवीधर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी व जिल्हाध्यक्ष प्रवीण दबाने यांची समयोचित भाषणे झाली.
या बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी सादिक खाटीक, आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज पाटील, कार्याध्यक्ष अजित जाधव, खानापूर तालुका पदवीधर संघटनेचे अध्यक्ष शाहरुख पठाण, आटपाडी तालुका टीडीएफ शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शेटफळे गावचे युवा कार्यकर्ते किशोर गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.किशोर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व कार्याध्यक्ष अजित जाधव यांनी आभार मानले.