रेडिओच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आटपाडीच्या दोन साहित्यीकांची परीक्षक म्हणून निवड

मोहनराव पुजारी
आटपाडी/प्रतिनिधी:

   माणदेशी FM रेडिओ (माणदेशी तरंग वाहिनी ) युनिसेफ आणि SBC३ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कविता स्पर्धेसाठी आटपाडीच्या दोन साहित्यिकांची निवड करण्यात आली .
  गोमेवाडीचे साहित्यिक प्रा . सुनील दबडे व सध्या भिलवडी येथे वास्तव्यास असलेले प्रा.सुभाष कवडे या दोन्ही साहित्यिकांनी राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षण केले.
  हे दोन्ही साहित्यिक आटपाडी तालुक्यातील आहेत .
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी महाकवी ग . दि . माडगूळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्पर्धेच्या संयोजकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी झुम मिटींगचे आयोजन केले होते .
  या मिटींगमध्ये प्रा . सुनील दबडे , प्रा . सुभाष कवडे यांच्यासहीत महाराष्ट्रातील कल्याण मुंबई , ठाणे , पालघर , पुणे , रत्नागिरी , सांगली , सातारा , सोलापूर , भंडारा , चंद्रपूर येथील स्पर्धक कवी सहभागी झाले होते . यावेळी स्पर्धेचा निकाल आर.जे. अनुप आणि सचीन मेनकुदळे यांनी जाहीर केला .
  यावेळी प्रा . सुनील दबडे व प्रा . सुभाष कवडे यांनी कवींना मार्गदर्शन केले .
यावेळी बोलताना सुनील दबडे म्हणाले की , सध्या महामारीचे संकट आहे . या संकटात पंढरीचा पांडुरंग मंदिर सोडून विविध रूपांत कामांत दंग आहे . पोलीस , डॉक्टर , नर्सेस , वॉर्डबॉय यांच्या रूपात पांडुरंग मानसांची सेवा करत आहे .
  यामध्ये महाराष्ट्रातील कवी साहित्यिक विचारवंत  , शिक्षक , पत्रकार , गायक ही मागे नाहीत . ते आपापल्या परीने महामारीच्या काळात लेखणी हातात घेऊन सेवा करीत आहेत .
  पांडुरंग जसा सेवेसाठी विटेवर नाही तर वाटेवर पोलीसाच्या रुपात उभा आहे . तसा कवी लेखकाच्या रूपात लेखणी हातात घेऊन पांडुरंग प्रबोधनाचे पण काम करीत आहे . अशा शब्दांत साहित्यिक दबडे यांनी महाराष्ट्रातील कवी साहित्यिकांचा तसेच कवी स्पर्धकांचा गौरव केला .
   महाराष्ट्रातील कवींना माणदेशी तरंग वाहिनी , एसबीसी३ आणि युनिसेफने व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यामुळे कवींनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली . माणदेशी तरंग वाहिनी , माणदेशी फाऊंडेशन आणि युनिसेफचा हा उपक्रम स्तुत्य आहे .
  दबडे पुढे म्हणाले की , कवीतांचे परीक्षण करताना मी व सुभाष कवडे सर आम्ही दोघांनी कवितेचा आशय , शब्द सौष्ठव, सादरीकरण आणि एकूण परिणाम या बाबींचा बारकाईने विचार करून कवितांना क्रमांक दिले आहेत . सर्वच स्पर्धकांच्या कविता वाचनीय , लक्षणीय आणि दर्जदार होत्या . प्रबोधन करणाऱ्या होत्या .परीक्षण करताना मनस्वी आनंद मिळत गेला .
   यावेळी बोलताना जेष्ठ साहित्यिक प्रा . सुभाष कवडे म्हणाले की , महाराष्ट्राच्या विविध भागांतून स्पर्धेसाठी कविता आल्यामुळे या स्पर्धेला उंची प्राप्त झाली आहे . कविता म्हणजे नकारार्थी विचार नसतो तर सकारात्मक विचारांची पेरणी असते .जी कविता साध्या सोप्या शब्दांत असते ती वाचकांच्या काळजाला थेट भिडते . तीच कवीता अव्वल असते .
  प्रा . कवडे पुढे म्हणाले की , या स्पर्धेमुळे कोरोनाच्या कालावधीत घ्यावयाची काळजी , जपावी लागणारी माणुसकी , प्रेम जिव्हाळा , विश्वास ही सगळी मूल्ये कवितांमधून आढळून आली . त्यामुळे माणदेशी तरंग वाहिनीने घेतलेल्या या स्पर्धा खुप महत्वाच्या ठरल्या आहेत .स्पर्धकांचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे .
यावेळी मंगेश मंत्री , प्रिती पाटील व आदित्य लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले .
  स्पर्धेतील कवितांचे ई -बुक तयार केले जाईल , प्रत्येक कवीला डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच भविष्यकाळात एफएम रेडिओतर्फे महाराष्ट्रातील कवींचे कवीसंमेलन घेण्यात येईल असे यावेळी माणदेशी तरंग वाहिनीमार्फत सांगण्यात आले .
यावेळी सांगोल्याचे कवी ज्ञानेश डोंगरे यांनी कोरोनाची लावणी सादर केली .