
संजय हुलगे
माळशिरस/ प्रतिनिधी:
पूर्वी शेती म्हटलं की डोळ्यासमोर उभं रहायचं ते अफाट कष्ट.त्यामुळे तरुणवर्ग शेतीकडे पाट फिरवत होता व मिळेल त्या नोकरीच्या मागे धावत होता.पण अलीकडे शेती व शेतीपूरक जोडधंद्यात तरुणवर्ग नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले नशीब अजमावत आहेत. एवढेच नव्हे तर शेती व शेतीपूरक जोडधंद्यांना नवनवीन प्रयोगाद्वारे तसेच आपल्या कल्पकतेने नवे स्वरूप देत आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते.ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पन्नाचे तसेच महत्त्वाचे साधन म्हणजे ‘परसबागेतील कुक्कुटपालन’.मात्र पारंपारिक पध्दतीने कुक्कुटपालनात कोंबडीद्वारे अंडी उबवली जातात. एक कोंबडी जास्तीत जास्त १५ते २०अंडी उबवून पिल्लांना जन्म देते व यामध्ये पिल्ले जगण्याचं प्रमाण हे निम्मेच.याचा विचार करूनच शेतकरी अविनाश बर्वे यांनी कृत्रिमरित्या अंडी उबवण्यासाठी कंपनी मेड मशीन विकत घ्यायचे ठरवले. मात्र त्या मशीनची किंमत पाहिल्यानंतर ती घेणे परवडणार नाही,असे त्यांच्या लक्षात आले.
‘गरज ही शोधाची जननी असे’ या म्हणीनुसार त्यांनी कृत्रिमरित्या अंडी उबवणाऱ्या मशीनचे कार्य कसे चालते याची माहिती इंरनेटवरून घेतली .तसेच त्यांनी आपल्या कल्पकतेने घरातील काही निरुपयोगी वस्तू व काही नवीन साधने वापरून कृत्रिमरित्या अंडी उबवण्याची मशीन घरगुती पद्धतीने तयार केली.
हे मशीन एका बंद पडलेल्या जुन्या फ्रिझमध्ये बनवण्यात आले आहे. बंद पडलेल्या फ्रिजचा वापर यामध्ये बॉक्स म्हणून करण्यात आला आहे. तसेच आपण हा बॉक्स थरमाकॉलचापण वापरू शकतो. या बॉक्स-मध्ये १००अंडी बसतात. बॉक्समध्ये उष्णता वाढवण्यासाठी १०० w चे दोन बल्ब जोडण्यात आले आहेत. Temperature controller Device च्या माध्यमातून बॉक्समधील तापमान नियंत्रित केले जाते.बॉक्समध्ये तापमान सर्वत्र समान राहण्यासाठी ४ इंच लहान कुलिंग फॅन जोडण्यात आला आहे.अंडी उबवन्यासाठी योग्य तापमानाबरोबरच योग्य आद्रतेचीपण आवश्यकता असते. म्हणून बॉक्समध्ये एक पाण्याने भरलेले भांडे ठेवले जाते.
मशीनमध्ये अंडी टाकल्यापासून साधारणतः १८ते २१ दिवसामध्ये पिल्ले निघण्यास सुरुवात होते. १८ व्या दिवसापासून अंडी फिरवणे बंद करावे. तसेच तापमान व आर्द्रता यामध्ये थोडी वाढ करावी. योग्य व्यवस्थापन व चांगल्या दर्जाची अंडी असल्यास अंड्यातून पिल्ले निघण्याचे प्रमाण ८०ते ९०% पर्यंत असते. तसेच पिल्ले निघाल्यानंतर सर्वप्रथम छोट्या जाळीमध्ये ठेवावीत व त्यांना उबीसाठी आतमध्ये १००w चा बल्ब लावावा. तो बल्ब साधारणतः पिल्लांना पंख येईपर्यंत ठेवावा. पाण्यासाठी व खाद्यासाठी भांडी वापरावीत. पिल्लांचे वेळोवेळी लसीकरण करावे.
त्यांची ही नाविन्यता प्रत्येक शेतकऱ्याला उपयोगी ठरणार आहे.पुणे येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या स्नेहल लाडे या कृषिकन्येने प्रत्यक्ष अविनाश बर्वे यांच्यासोबत त्यांच्या नाविन्यतेची माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष मशीन कशी बनवायची हेही ती शिकली.
महत्त्वाच्या बाबी-
*३७.४ते३८ अंश सेल्सिअस तापमानाला अंड्यामध्ये चांगल्याप्रकारे उब तयार होते.
*आद्रता ६०%ते ७०% राहण्यासाठी पाण्याच्या भांड्यात रोज पाणी टाकावे.
*अंडी दिवसातून दोनदा पलटावीत.
*१८ ते२१ दिवसापर्यंत पिल्लांची वाढ पूर्ण होते.म्हणून आद्रता व उब वाढवावी. तसेच अंडी फिरवणे बंद करावे.
अविनाश बर्वे यांनी बनवलेली घरगुती मशीन नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना उपयोगी ठरेल.त्यांची ही नाविन्यता तरुणवर्गांना प्रेरणादायी आहे. ” ५ रुपयाच्या अंड्यापासून ५० रुपयांचे पिल्लू ” ही कल्पना शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून उपयुक्त ठरेल.
-स्नेहल लाडे,अभ्यासक.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा