
संजय हुलगे
माळशिरस/ प्रतिनिधी:
ऊस लागवड करताना महिला पुरुषांना ऊस सवळणे,बेणे अंथरणे यासारखी कामे करून मदत करीत असतात. परंतु खंडोबावस्ती (माळशिरस) येथील सात महिलांनी उसाची संपूर्ण लागवड करून आम्हीही पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतो हे दाखवून दिले असून या महिलांच्या काम करण्याच्या चिकाटीचे या परिसरातील शेतकऱ्यातून कौतुक होत असून त्यांच्याकडे उस लागवडीची मागणी वाढू लागली आहे .
महिला सर्वच क्षेत्रात पुढे येवू लागल्या आहेत.त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत .सततच्या पावसामुळे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मजुरांच्या हाताला काम नाही.शेतकरीवर्गही शेतातील अनेक कामे यंत्राच्या सहाय्याने करू लागला आहे.यापूर्वी खुरपणीची कामे महिला करीत होत्या. पाऊस काळानंतर सर्वत्र तण वाढत असल्याने मजूर मिळणे मुश्कील होत होते.परंतु आता सर्वच पिकांमधील तणासाठी औषधे उपलब्द्ध झाली आहेत. शेतकरी औषध फवारणी करू लागला आहे.त्यामुळे मजुरांच्या हाताला काम राहिले नाही.
जून महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे ऊसाच्या लागवडी जमिनीस वापसा नसल्याने लांबल्या आहेत.आता उघडपीनंतर लागणीला वेग येणार आहे .हाताला काम नाही,करायचे काय? त्यामुळे या ठिकाणच्या ताई दामोधरे,माया दामोधरे,तुळसा दाभाडे,राणी वाघमोडे,अश्विनी वाघमोडे ,सुरेखा गिरमे,उषा गोळे या सात महिलांच्या टोळीने उस लागणीची वाढती मागणी पाहून उस लागवडीची कामे करण्याचे ठरवले .सतत इतर शेतीच्या कामात या महिलांची चिकाटी पाहून विश्वास महामुनी या शेतकऱ्यांनी या महिलाच्या टोळीला ऊस लागवडीचे काम दिले.महिलांनी ऊसाला सोडलेल्या सरीचे उशे,पायथे बांधून दंड ओढले.त्यानंतर उसाचे बेणे तोडून ट्रक्टरमध्ये भरून आणणे व ऊसाची लागवड केली.यामध्ये त्यांनी कोणत्याही कामात पुरुषांची मदत घेतली नाही.पुरुषांप्रमाणे ऊस लागवड करून आम्हीही कुठे मागे नाही दाखवून दिले असून त्याच्या या कामाच्या चिकाटीचे कौतुक होत असून त्यांच्याकडे ऊस लागवडीची मागणी वाढू लागली आहे.
महिलांना प्रोत्साहन देणे आवश्यक-विश्वास महामुनी
या महिला अनेक वर्षापासून शेतातील कामे करीत आहेत.त्यांची कामाची चिकाटी आहे.त्यांनी ऊस लागवडीची मागणी केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूनेच ऊस लागवडीचे काम दिले.महिला कामासाठी पुढे येत असल्यास त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा