
संजय हुलगे
माळशिरस/प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टीकडून सर्व तालुका अध्यक्षाच्या निवडी पार पडल्यानंतर आत्ता सर्वत्र कार्यकरणीच्या निवडी करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये माळशिरस तालुक्यात खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक हॉटेल मॅरीडियन याठिकाणी घेण्यात आली.
यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अजित पवार, रामराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली.ते म्हणाले, त्यांनी बारामतीला पाणी वळवले तरी मी कॅनॉल बंद करू दिला नाही.अजित पवार व रामराजे निंबाळकर यांनी मुद्दाम माळशिरस भागाला पाण्याचा विरोध केला.सत्ता येताच पाणी पुन्हा बारामतीकरांनी पळवले,तरीही माझ्या काळात कॅनॉल बंद करू दिला नाही.
भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधीही पार्टी मागे ठेवत नाही.त्याच्या कामाचा योग्य तो मोबदला त्याला मिळतोच. त्यामुळे जे पद मिळणार आहे, ते पद म्हणून नाही,तर ते संधी म्हणून त्या पदावर काम करा. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावरच भाजप देशात एक नंबरला गेला आहे. माळशिरस तालुक्याची नाराजी लक्षात घेता धनगर समाजाला योग्य न्याय दिला जाईल, तसेच धनगर समाजाचे भांडवल करू देणार नसल्याचे यावेळी श्रीकांत देशमुख यांनी बोलताना सांगितले.
निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले,जेव्हा कुठे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि खासदार या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आले.त्रिपुराचा उल्लेख झाला, केरळमध्ये दिवसा ढवळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची कुटुंब उध्वस्त झाले.परंतु अटलजींचे वाक्य हृदयामध्ये ठेवून कभी भिते आखेले कब नही डरे ही मानसिकता मनामध्ये ठेवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता काम करतो. मी आमदार झालो, दादा खासदार झाले,या तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहायचं म्हटलं तर सगळ्यांनीच आपल्याला साथ दिली.जुने असो अगर नवे सर्व कार्यकर्ते घेऊन काम करायचे मनामध्ये कुठलाही संकोच ठेवायचा नाही. तालुक्यामध्ये मी आमदार झाल्यापासून मी जनतेच्या संपर्कात असतो. मला कधीही फोन करा,रात्री ११ .३० वाजेपर्यंत फोन केला तरी मी फोन उचलतो. आपल्याला पक्षाचे काम वाढवून आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. सामान्य मजुराचा कार्यकर्ता आमदार होत असेल तर कार्यकर्तादेखील प्रमुख असतो. पन्नाप्रमुखसुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. भारतीय जनता पार्टीने यांना गृहमंत्री बनवले,असे आमदार राम सातपुते बोलत होते.
या आढावा बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक रवी अनासपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार राम सातपुते ,धैर्यशील मोहिते पाटील , भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डॉ . आप्पासाहेब देशमुख, काकासाहेब मोटे, के.के पाटील, अतुल सरतापे, माजी तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, संजय मोटे, लक्ष्मण गोरड, विजय देशमुख, अतुल सरतापे, संजय देशमुख ,गोरख देशमुख, रावसाहेब देशमुख उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांना आमदार राम सातपुते, श्रीकांत देशमुख, रवी अनासपुरे, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सरगर व आभार संजय देशमुख यांनी मानले.
या आढावा बैठकीवर जुन्या भाजप गटाचे वर्चस्व जाणवले.मोहिते-पाटलांची उशिरा उपस्थिती काहीशी उणीव भरून काढणारी असली,तरी नवीन तालुका अध्यक्षाची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला. नव्या अध्यक्षांना संबंधित आढावा बैठकीचे निमंत्रण नव्हते का? का याबाबत त्यांना कल्पना नव्हती? अशी दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज ऐकायला येत होती.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन