‘शाळा बंद,पण शिक्षण सुरू’ उपक्रम यशोगाथा

संजय हुलगे
माळशिरस/प्रतिनिधी:

“माझा तालुका,माझे उपक्रम” जागतिक स्तरावरून कोरोनाचे संकट हे विविध प्रसारमाध्यमातून दररोज पाहायला मिळत होते. पण तो आपल्या जवळ येईल असा विचार मनात नसताना सुद्धा अचानक कोरोनाच्या रुग्णांचे देशात आगमन झाले व काही समजायच्या आतच लाँकडाऊन जाहीर झाले .शाळा बंद, मुले-शिक्षक घरातच बंदिस्त झाले. काही तरी होईल व एक महिन्यात शाळा पुन्हा चालू होतील असेच वाटले. पण आजतागायत फक्त वाट पाहतोय, शाळा चालू होण्याची! पण सुट्टी मिळाली आहे,आराम करावा असे कधीच वाटले नाही.क्षणाक्षणाला आठवण यायची ती शाळेची विद्यार्थ्यांची!त्या आठवणीतून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन सहशालेय उपक्रम चालू ठेवण्याचा निश्चय केला व तो यशस्वीही झाला.
शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू रहावे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व मिळालेल्या वेळेचा त्यांनी सदऊपयोग करून नवनिर्मितीतून आनंद मिळवावा हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर होता व आजही आहे.
इंग्रजी विषयाच्या व्हिडिओ निर्मितीमधून त्यांना इंग्रजी अध्यापन सुलभ व्हावे, यासाठी व्हिडिओ निर्मिती केली. यासाठी आमच्या माळशिरस तालुक्याच्या “लर्न फ्रॉम होम” या ग्रुपच्या साह्याने माझे उपक्रम तालुक्यातील व तालुक्याबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले .इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी घटकानुसार व्हिडिओ निर्मिती करून Test link बनवल्या. त्याला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.दर रविवारच्या मूल्यवर्धन या पुष्पाअंतर्गत चित्रकला, विद्यार्थी सहशालेय उपक्रम ,वक्तृत्व, कथाकथन ,घोषवाक्य इत्यादी आधारित व्हिडिओ दिले. कार्यानुभव या विषयाअंतर्गत विविध कागदी, शोभेच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून दाखवल्या व त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले .या उपक्रमासाठी पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.केंद्रप्रमुख नाचणे,विस्ताराधिकारी नकाते, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनजंय देशमुख या सर्वांचे वेळोवळी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
उपशिक्षिका सोनी प्रभाकर कानडे
जि. प. कन्याशाळा माळशिरस, ता. माळशिरस, जि.सोलापूर .