माजी आमदार विजयराज शिंदे यांचा भाजपात प्रवेश!

सुभाष मोरे
बुलडाणा/प्रतिनिधी:

बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी २५ आॅगस्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून तीनवेळा बुलडाणा विधानसभा संघाचे नेतृत्त्व केले होते.नंतर त्याच्यात व खासदार प्रतापराव जाधव यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे टिकीट नाकारल्याने त्यांनी ऐनवेळी बहुजन वंचित आघाडीत प्रवेश करून २०१९ची विधानसभा निवडणूक ‘वंचित’तर्फे लढवून दुसऱ्या क्रमांकांची मते घेतली होती.
शिंदे यांच्या प्रवेशाने बुलडाणा विधानसभा मतदार संघाची ताकद वाढून पक्षाला निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संजय कुटे,बुलडाणा जिल्हा अध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले, भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्यासह शिंदे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.