दोन्हीही आमदार सदैव ‘ॲक्टिव्ह’,खासदार मात्र बनले ‘लेट रिॲक्टिव’ !

माळशिरसमध्ये खासदारांची दोन्ही आमदारांना वगळून आढावा बैठक, जनतेचे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस

माळशिरस तालुक्यात दोन्हीही आमदार कामात अग्रेसर असताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांना वगळून आढावा बैठक घेतल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेचे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
माळशिरस तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने दोन महिन्यापू्वीच खरी आढावा बैठक घेण्याची गरज असताना खासदारांनी शेतकऱ्यांची पिके जळून खाक झाल्यानंतर आता आढावा बैठक घेण्याची आठवण आली आहे.खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यात आमदार राम सातपुते व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना वगळून दुष्काळाबाबत आढावा बैठक घेतल्याचा फार्स केल्याने माळशिरस तालुक्यातील बहुसंख्य जनता व मोहिते-पाटील गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे दुष्काळाबाबत प्रशासनाची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामे करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यातून विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र याचे श्रेय घेण्यावरून खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात छुपे मतभेद सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी भाजपने प्रयत्न केला आहे; मात्र यश आले नाही.
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी मोहिते-पाटील गटाने सुरू केली आहे. यामुळे मोहिते व निंबाळकर यांच्यात आणखी मतभेद वाढले जात आहेत.
खासदार नाईक-निंबाळकर यांनी मोहिते- पाटील यांचे विरोधक आमदार बबनदादा शिंदे यांच्याश जवळीक केली आहे. शिंदे यांनी नाईक-निंबाळकर यांना दोन लाख मताने विजयी करू, अशी घोषणा केली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने माळशिरस तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा आढावा घेण्यासाठी खासदार नाईक-निंबाळकर यांनी बैठक बोलाविली होती.
सदर बैठक माळशिरस येथील सभागृहात प्रांताधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, तालुका कृषी अधिकारी पूनम चव्हाण, नातेपुते, माळशिरस, अकलूज, महाळुंग श्रीपुर या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह पाणीपुरवठाविभाग, नीरा उजवा कालवा जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग प्रमुख व माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, के. के. पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, ॲड. सोमनाथ वाघमोडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस पंचायत समितीचे गटनेते रणजितसिंह जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, शिवराज पुकळे, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य अजय सकट, बाळासाहेब वावरे, पांडुरंग देशमुख, अतुल सरतापे, विष्णुपंत नारनवर, युवराज झंजे, भुजंगराव शिंगाडे, पांडुरंग पिसे, विजयराव गोरड, किसन राऊत, मच्छिंद्र गोरड यांच्यासह विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध राजकीय पक्षांचे व संघटनांचे नेते व कार्यकर्ते या टंचाई आढावा बैठकला उपस्थित होते.
या बैठकीस शासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र दोन आमदार,आमदार राम सातपुते व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना बैठकीसाठी निमंत्रण नव्हते. यामुळे मोहिते-पाटील गटातून नाराजी व्यक्त होत आहे. शासकीय अधिकारी मोहिते- पाटील गटाच्या स्थानिक परिस्थितीनुसार निर्णयाशी संलग्न असल्याने खासदार नाईक निंबाळकर यांनी घेतलेली बैठक ही फार्स असल्याची चर्चा रंगू लागली आहे.