अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या: लहुजी साळवे कर्मचारी महासंघाची मागणी

औसा (जि.लातूर)/ प्रतिनिधी:

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान असणारा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे,अशी मागणी औसा येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्यावतीने तहसिलदार यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी दिड दिवस शाळा शिकून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई येथे सामान्य कामगार म्हणून काम करताना कामगारांच्या व्यथा मांडण्यासाठी क्रांतीकारी चळवळ केली.कथा ,कांदब-या आणि शाहिरीच्या माध्यमातून शोषित, पीडित समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडून समाज जागृती करण्याचे कार्य त्यांनी करुन शोषितांना नवी दिशा दिली आहे.२०२०हे अण्णाभाऊ साठे यांचे  जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी केलेल्या दलित, शोषित, पीडित समाज उद्धाराचे कार्य हे प्रेरणादायी आहे.त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,अशी मागणी केली आहे. महासंघाचे अध्यक्ष संभाजी शिंदे, सेक्रेटरी संभाजी नामवाड, डॉ.श्रीमंत क्षीरसागर, जालिंदर बनसोडे,राम शिंदे, महिला प्रतिनिधी उषा गायकवाड, नगरसेविका अॅड.मंजुषा कसबे, बालाजी पाटोळे आदिच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.