
आटपाडी येथे मोदी @9 कार्यक्रमांतर्गत पत्रकार परिषद
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
सरकारच्या माध्यमातून भारतातील व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण सर्वांगीण विकास झाला असून लोकांनी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांकडे सकारात्मकतेने बघितले पाहिजे, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी येथे व्यक्त केले. आटपाडी येथे मोदी @9 कार्यक्रमांतर्गत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष उमाजी सरगर, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग,युवानेते अनिलशेठ पाटील, युवा नेते जयवंतराव सरगर, सोशल मीडियाचे आटपाडी तालुकाप्रमुख अनिल सूर्यवंशी, बाजार समितीचे माजी संचालक विष्णुपंत अर्जुन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब पुजारी व शरद काळेल, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार पडळकर बोलताना म्हणाले,नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान पदी विराजमान होऊन नऊ वर्षे झाली. गावापासून राजधानीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक ते 30 जून पर्यंत मोदी @9 हा कार्यक्रम वेगवेगळ्या उपक्रमांनी राबवला जात आहे. टिफिन बैठका, भाजपच्या अंतर्गत सर्व मोर्चाच्या प्रमुखांच्या बैठका पार पडल्या. नऊ वर्षात झालेले काम पत्रकारांच्या माध्यमातून जनतेसमोर जावे यासाठी पत्रकार बैठकांचे आयोजन करण्यात आले.
मोदी साहेब पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला. किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरली. महाराष्ट्रातील एक कोटी सात लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. त्यातील वंचित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी करून गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम झाले. आणखी काही शेतकरी राहिले असल्यास आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. राज्य व केंद्र सरकारच्या प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या रकमेतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 80 कोटी लोकांना धान्य देण्याची योजनेतून लोकांना फायदा झाला आहे.
कोविडच्या काळामध्ये भारताने संकटाला संधी म्हणून लसीकरणाच्या बाबतीत जगामध्ये चांगले काम केले. इतर देशांनाही लस देण्यामध्ये आपण अग्रेसर ठरलो त्यामुळे जगामध्ये भारताविषयी वेगळा चांगला आदर्श तयार झाला. मोदी साहेबांनी जगाचे नेतृत्व करावे असे अनेक देशांनी सांगितले. जगातील राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान यांचे विधान आहे. देशातील विरोधी पक्षातील लोकांनी या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. कोरोनाच्या काळात पीपीई किट व एन 95 मास्क आपण सुरुवातीच्या काळात मागवले. मात्र मोदी साहेबांनी उद्योजकांना आवाहन करून भारतात त्याची निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले. जगामध्ये आपण त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर आहोत.जी20 चे नेतृत्व आपल्याला मिळाले. त्याचा खूप चांगला फायदा झाला. पहिल्यांदाच असं घडलं की डब्ल्यू एच ओ चे अध्यक्ष पद आपणास मिळाले.
भारतीय सैन्य दलाच्या बाबतीत झालेला बदल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आत्तापर्यंत आपण बाहेरून शस्त्रास्त्रे खरेदी करीत होते.नरेंद्र मोदी साहेब आल्यानंतर पहिल्यांदा असे घडत आहे की, 2800 प्रकारची शस्त्रे तयार झाली व आपण ती जवळपासच्या देशांना निर्यात केली. यावर्षी 81 देशांना आपण शस्त्रास्त्र पुरवतोय, याचा सार्थ अभिमान आहे. पूर्व भागात चीनकडून नेहमी आक्रमण होत होते.आता तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे आता तिथे आपले विरोधी जे देश आहेत त्यांची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. वन रँक वन पेंशन सैन्यामध्ये जवानांना लागू केली.सर्व जवानांना आता सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मिलिटरीच्या सर्व अधिकाऱ्यांना आता जाग्यावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे मंत्रालय पातळीपर्यंत करण्याची वाट पाहण्याचा वेळेचा अपव्यय टळला.
खाजगी संस्थांमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 85% जागा गुणवत्तेप्रमाणे भरल्या जातील असा कायदा केला. महाविद्यालयांची संख्या वाढवली. सीट क्षमता वाढवली. विद्यापीठांची संख्या तीन चार पट वाढवली.
लोकांनी या सर्व निर्णयांकडे सकारात्मकतेने बघितले पाहिजे.
खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये टेंभू योजना लागू करताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी एकत्रितपणे मिळून पूर्ण करून त्याचा फायदा झाला. राष्ट्रीय महामार्ग निर्माण केला. राष्ट्रीय महामार्ग योजनेमध्ये केंद्र सरकारने बदल करून दर दिवशी 35 किलोमीटर रस्ते तयार केले जात आहेत. पूर्वी ते बारा किलोमीटर होत होते. ज्या देशांमधील पायाभूत सुविधा मजबूत असतात, तोच देश विकासाच्या दृष्टीने पुढे जाऊ शकतो ही नस नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखली.जगामध्ये आपण आता पुढे आहोत. रस्त्याच्या बाबतीत अमेरिका जरी पुढे असले तरी आणखी दोन-तीन वर्षे मिळाली तर भारत प्रथम क्रमांकावर जाईल. समृद्धीसारखा महामार्ग जाहीर केला.शक्तीपीठ मार्गावर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील जिल्हे येणार आहेत. सुरत वरून दक्षिण भारतात जाणारा चाळीस हजार कोटी रुपयांचा रस्ता व पुणे बेंगलोर हायवेला समांतर रस्ता जो आपल्या खानापूर मतदारसंघांमधून जातो. अन्य पक्षाच्या नेतृत्वांना रस्त्यांच्या उन्नती बाबत प्रयत्न करावेत असे का नाही वाटले? भारतीय जनता पार्टीकडे कल्पना करणारे नेतृत्व आहे, त्या कल्पना सत्यात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न, चिकाटी, मेहनत करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून असे चांगले निर्णय होत आहेत.
केंद्र सरकारने निमकोटेड युरियाची निर्मिती करून युरियाचा काळाबाजार थांबवला. त्यामुळे भेसळीसाठी वापरण्यात येणारा युरियाचा प्रकार थांबला. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे खताच्या किमती वाढल्या असताना आपल्याकडे मात्र या किमती वाढल्या नाहीत. कारण केंद्र सरकारने लाखो, करोडो रुपये या योजनेसाठी ठेवलेली आहे, ज्यामुळे सबसिडी मिळून लोकांना महागाईला सामोरे जावे लागणार नाही.खूप सारे चांगले निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले आहेत.
वैद्यकीय उपचाराच्याबाबतीत आयुष्यमान भारतचे कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्र करून लोकांना कार्ड वाटप करण्याची योजना आखली. पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय सरकारने घेतले. अनेक सहायता निधीतून आपण उपचार करतो.
राजेवाडी तलावाच्या बाजूला पर्यटन केंद्र निर्माण करावं ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बोट क्लब, रिसॉर्ट, मंगल कार्यालय तेथे निर्मिती करावी. जलसंपदा खात्याच्या सहाशे एकर जागेमधून करार करून हे क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न करावा, असे अनेक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मार्गी लावत आहोत.
ओबीसींना दहा लाख घरांची घोषणा सरकारने केली आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत. त्यातून राहिलेल्या लाभार्थ्यांना त्यांना आपण घरे देवू. ओबीसी बांधवांनी घरांची मागणी करा. भटक्या विभक्तांसाठी पन्नास हजार घरांची व धनगर समाजासाठी 25000 घरांची योजना राज्य सरकारने आणली आहे. धनगर समाजातील वाड्या रस्त्यापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर रस्तेजोड योजना आणली. संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना,आदिवासी पाडे जोडण्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना आणली. चार हजार कोटी रुपये त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपलब्ध करून दिले.
रोजगार हमी योजनेतून पाच एकर क्षेत्राच्या आतील शेतकऱ्यांना विहीर मिळते, त्यासाठी 500 मीटर अंतराचे जी अट होती ती सरकारने बंद केलेली आहे. त्यामुळे आता विहिरीसाठी प्रस्ताव दाखल करावेत. असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन