

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज काढला आदेश
शिक्षक संघाच्या मागणीला यश
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई, वीज कपात या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो,याचा विचार करून ८ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील सर्वच शाळा सकाळ सत्रात सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत भरविण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी शिष्टमंडळाच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे निवेदन देऊन केली होती.
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपालिकेच्या सर्वच शाळा बुधवार दिनांक ८ मार्चपासून सकाळ सत्रात सकाळी ७:२० ते ११:३० या वेळेत भरवण्याचे लेखी आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढले असून शिक्षक संघाच्या मागणीला यश आल्याची माहिती महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ सांगली शाखेचे जिल्हाध्यक्ष अमोल माने सरचिटणीस राहुल पाटणे यांनी दिली.
तसेच इयत्ता पहिली दुसरी व सहावीसाठी जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्य असून सदरची परीक्षा ही रविवारी सुट्टीच्या दिवशी घेण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक संघाने केली होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार होऊन रविवारी सुट्टीच्या दिवशी परीक्षा न घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्याबद्दल प्रशासनाचे शिक्षक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले. इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या मार्गदर्शक पुस्तिका व प्रश्नसंच सर्व शाळांना जिल्हा परिषदेमार्फत छापून पुरवण्यात आलेत. इयत्ता सहावीची मार्गदर्शिका पुस्तिका व प्रश्नसंच दोन दिवसात शाळांमध्ये पोहोच होणार असून जिल्हा परिषदेने पुरविलेल्या मार्गदर्शिका व सराव प्रश्नसंच उत्तम प्रतिचे असून शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत. सदर मार्गदर्शिका व सराव प्रश्नसंच सर्व शाळांना वेळेत प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण विभागाचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल माने, सरचिटणीस राहुल पाटणे, कार्याध्यक्ष दिलीपराव खोत, कोषाध्यक्ष मारुती देवडकर, प्रतापराव गायकवाड, भारत क्षीरसागर, बाळू गायकवाड, यशवंत गोडसे, संजय खरात, विजय साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश