
कामातील सातत्याने यश मिळते:गटविकास अधिकारी मनोज भोसले
दिघंची येथे ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
दि.१८ रोजी परीक्षण,बक्षीस वितरण व सांगता समारोप,आ. गोपीचंद पडळकर अध्यक्षस्थानी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची/आटपाडी
ताकदीपेक्षा विचाराने केलेले काम व त्या कामातील सातत्य यामुळे व्यक्ती यशस्वी बनते,असे मत आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी दिघंची येथे व्यक्त केले.
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या दिघंची हायस्कूल व र.मि.कलाल ज्युनियर कॉलेज येथे ५० व्या आटपाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आयोजित आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग व दिघंची हायस्कूल दिघंची यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव एच.यु.पवार,निरीक्षक ए.बी.चौगुले,भाजपा नेते जयवंतराव सरगर, दिघंचीचे माजी सरपंच व युवा नेते अमोल मोरे,ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे,माजी उपसभापती बळवंतराव मोरे, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे संचालक सावंता पुसावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नानासाहेब मेनकुदळे,आटपाडी तालुका भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रणव गुरव,दिघंचीचे उपसरपंच यादव,गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी व विज्ञान सल्लागार अशोक म्हेत्रे,विस्तार अधिकारी मैनाताई गायकवाड, सुभद्रा गायकवाड व कसबे, प्रशांत चंदनशिवे, समूह साधन व्यक्ती सचिन हेगडे,दिघंची गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एम.साळुंखे,जीवनदीप विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बी.बी.कोकरे,आवळाई ग्रामपंचायतीचे सरपंच गजेंद्र पिसे, आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी मनोज भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये अचानक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही. निव्वळ शारीरिक ताकतीने व्यक्ती यशस्वी होत नाही.कामात सातत्य ठेवल्यानंतर व्यक्ती परिपूर्ण होते.
माजी सरपंच व युवा नेते अमोल मोरे म्हणाले, दिघंचीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम राबवावेत. आमच्या गावातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांचा लाभ द्यावा. त्यासाठी ग्रामपंचायत पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्य गणित-विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष एस.डी.शिंदे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी,विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विज्ञान वरदान ठरेल,शाप ठरणार नाही,त्याकरिता असे विज्ञान सोहळे होणे गरजेचे आहे.
मुख्याध्यापक डी.एन.कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.पर्यवेक्षक डी.एम.पाटील यांनी आभार मानले.एम.आर. गायकवाड व कुमार नळ भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून व विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे विज्ञान प्रदर्शनासाठी संयोजन केले.हायस्कूलच्या शिक्षिकांनी आकर्षक रांगोळीने व कलाशिक्षक प्रमोद तुपे यांनी फलक सजावट केली होती.
यावेळी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा दिघंची हायस्कूल व आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.
दुपार सत्रामध्ये आटपाडी तालुका विज्ञान अध्यापक संघाच्यावतीने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी उद्या घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य गणित-विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष एस.डी.शिंदे,आटपाडी तालुकाध्यक्ष ए.एस.नांगरे,बी.पी.जाधव,आर.ए.वंजारी,डी.एन.नागणे, सचिन मोरे,जे.बी.कुलकर्णी,ए.बी.नलवडे,एस.बी.साळुंखे, एस.बी.देशमुख,एम.बी.देवकर यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या.
इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक गटामध्ये ५०, इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये ४७ साहित्याची नोंदणी होऊन सहभाग घेतला आहे. शिक्षक गटामध्ये सात साहित्याची व प्रयोगशाळा सहाय्यक/ परिचर गटामध्ये एका साहित्याची नोंदणी करण्यात आली आहे. उद्या दि.१८ रोजी या सर्व स्पर्धांचे परीक्षण होणार आहे. दुपारी ३.३० वा.विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आमदार गोपीचंद पडळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,केंद्रप्रमुख,शिक्षक व प्रशासकीय वर्ग तसेच दिघंची हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश