

साळमळगेवाडीत सत्तांतर,सरपंचपदी वर्षाताई मासाळ विजयी
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्तांतर झाले असून भाजप-काँग्रेस युतीला धक्का देत गावातील युवा नेते रविंद्र कित्तुरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे.तालुक्यात एक सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या युवा नेते विक्रम ढोणे गटाच्या वर्षाताई मासाळ यांनी सरपंचपदावर विजय मिळवला आहे. सरपंच वर्षाताई विजयी झाल्याने विक्रम ढोणे गटाचा तालुक्यात पहिला सरपंच व ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.युवक नेते विक्रम ढोणेंनी साळमळगेवाडीत सामान्य जनतेचे कोणतेही प्रश्न असो, ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
युवा नेते रवींद्र कित्तुरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास युवाशक्ती पॅनल (विक्रम ढोणे गट) विरुद्ध भाजप-काँग्रेस युती असे पॅनल उभे होते. त्यामध्ये ग्रामविकास युवाशक्ती पॅनलचे (विक्रम ढोणे गट) पाच सदस्य निवडून आले. भाऊसो माने,सरफराज शेख,पूजा बुवा,बाबासो कित्तुरे, शांताबाई हराळे आदी विजयी झाले आहेत.
निवडणूक निकाल जाहीर होताच साळमळगेवाडीच्या युवक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. नूतन सरपंच,सदस्यांना जत शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्तंभास आणि मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पॅनेल प्रमुख रवींद्र कित्तुरे म्हणाले,सत्ताधाऱ्यांनी गावात कोणालाच विश्वासात घेतले नसल्याने नाराजी मोठी होती. गावातील तरुणांनी एकत्रित परिवर्तनाचा लढा उभा केला. त्या लढ्याला यश आले. सामान्य जनतेच्या पाठिंबावरच हा ऐताहासिक विजय प्राप्त झाला. यापुढे आम्ही लोकाभिमुख कारभार करू, असा शब्द देत गावकऱ्यांचे आभार मानले.
सरपंच वर्षाताई मासाळ म्हणाल्या की, गावाने जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना सोबत घेऊन विक्रम ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करू, अशी ग्वाही देत मतदारांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन