

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोपरगाव
राहाता तालुक्यातील शिर्डी येथे श्री साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी मंथन वेद भविष्याचा या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियमानुसार पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरासाठी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आ.हसन मुश्रीफ,आ.जितेंद्र आव्हाड,आ.धनंजय मुंडे, आ.अरुण लाड, आ.अमोल मिटकरी, सेवादल प्रदेशाध्यक्ष डॉ.जानबा म्हस्के, कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे, कोपरगाव तालुक्याचे आमदार व श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आमदार अशितोष दादा काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेले अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यस्तरीय शिबिरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आपले विचार मांडताना म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. या आरक्षणाचे श्रेय आरक्षण विरोधी लोक घेऊन पाहत आहेत. मंडल आयोगाला विरोध करणाऱ्यांचा बुरखा फाडायला हवा. लोकशाहीत वेळेवर निवडणुका व्हायला हव्यात. निवडणुका न घेणे लोकशाहीला चांगले नाही. लोकशाहीला नख लावून गळा घोटण्याचे काम सध्या सुरू आहे.राज्यात आघाडीची सत्ता आणायची आहे. कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असतात.तेच खासदार, आमदार निवडून आणतात. त्यामुळे पक्ष सभासदांनी अधिकपणे आपल्या भागात जास्तीत जास्त तळागाळापर्यंत, घराघरापर्यंत जाऊन पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी घरोघर जाऊन नोंदणी वाढायला हवी. हे शिबिर संपल्यानंतर त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा आदेशही अजित दादा पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
ते म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने देखील त्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणे अतिशय महत्त्वाचे आहे. काही दिवसापूर्वी आपण बघितले असाल की आपल्या महाराष्ट्रातून काही लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेली आहे. आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळी आमच्याबरोबर असताना एकनाथ शिंदे नवीन प्रकल्प राज्यात येणार असल्याचे सांगतात. मी स्वतः रतन टाटांना भेटलो होतो. ते महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होते. मात्र सत्ता परिवर्तन होताच राज्यातील 25 हजार 368 कोटीचे प्रकल्प महाराष्ट्रातून गायब झाले. असे असले तरी विरोधक मात्र हिटलरची गोबेल नीती राबवीत आहेत. राज्यातून गेलेल्या प्रकल्पापेक्षाही मोठे प्रकल्प आणू असे राज्यातील सत्ताधारी सांगत असले तरी गेलेल्या प्रकल्पापेक्षा मोठे प्रकल्प आणण्याची धमक या सरकारमध्ये नाही असे त्यांनी ठामपणे यावेळी सांगितले.
यावेळी या शिबिरास अनेक ज्येष्ठ तज्ञ अभ्यासू व्यक्तींनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंथन वेध भविष्याचा या शिबिरात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आजारी असल्याकारणाने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र आज शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आजारी असून देखील शिबिरास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना थोडक्यात व मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यक्रमानी संपूर्ण धुरा सांभाळून सदरचे मंथन वेध भविष्याचा हे शिबिर यशस्वी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यशस्वी झाले असून पुढील रणनीती ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घर तेथे राष्ट्रवादी कार्यकर्ता अशी नियोजनबद्ध धोरणे अवलंबून पक्ष वाढीसाठी व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला सुरुवात करतील अशी आशा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन