
प्रगल्भनायक न्यूज
म्हसवड
माण खटाव मतदारसंघातील जनतेला आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्यांचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी प्रवृत्ती थांबवा असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
मार्डी, ता. माण येथे स्वर्गीय आमदार सदाशिव पोळ यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज पोळ यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आ. मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेंद्र गुदगे, श्रीराम पाटील, सुभाष नरळे, सुनील पोळ, सोनाली पोळ उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले, आगामी माण तालुक्यातील सर्व निवडणुका या प्रभाकर देशमुख आणि मनोज पोळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्यांचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. सत्तेचा माज येऊ देऊ नका. कोणताही अधिकारी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही. सत्तेच्या जोरावर विनाकारण कोणीही त्रास देऊ नये असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना त्यांचे नाव न घेता लगावला. मांडीला मांडी लावून बसणारे अनेक महाभाग निवडणुकीत विरोधात जाऊन मतदान करतात. आपण एका पक्षाचे नेते आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. आमच्याबरोबर राहून कुरघोड्या करणाऱ्यांनी व्यासपीठावर बसू नये अशा कान पिचक्याही त्यांनी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांनी स्वर्गीय सदाशिव पोळ यांच्या राजकीय कामकाजाची वैशिष्ट्ये आपल्या भाषणात सांगीतली.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन