

बी.के.कोकरे – जी.के.(गोपीचंद कुंडलिक) पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर वाढदिवस विशेष…
आज दि.१ऑक्टोबर रोजी खमक्या आवाजाच्या दमदार आमदारांचा वाढदिवस! यानिमित्ताने लेख प्रपंच…!
मी लहान असताना गावातील सरपंच यांच्याशी बोलायला संधी मिळाली तर खूप आनंद व्हायचा, पण हळूहळू जसे वय वाढू लागले, तसे राजकारणाविषयी आकर्षण वाढू लागले. मोठमोठ्या पुढार्यांची भाषणे ऐकायला गावापासून सांगलीपर्यंत ट्रकात/टेंम्पोत बसून सांगली,इस्लामपूर,आटपाडीपर्यंत जायचो.अगदी लहान वयातच पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरली. तिथे कामांवर जात असलो, तरी भाषणे ऐकायचा नाद काय सुटत नव्हता, मग ते भाषण कोणाचे का असेना ! मुंबईत पहिले भाषण ऐकले ते स्व.प्रमोदजी महाजन,नंतर नादंच लागला! जिथं भाषण, तिकडे जायचं! माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी, शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे,भाई संगारे, रामदासजी आठवले,स्व.आदरनीय मा. कांशीरामजी, लालू प्रसाद यादव, बहन मायावती, आबू आझमी ,राज ठाकरे यांची भाषणे ऐकायचो.
पुढे एकवेळ अशी आली, धनगर समाजाचा गोवंडी येथे मेळावा होता. त्या समूहातून आल्यामुळे आकर्षणापोटी तिथे एक तरूण जोरजोरात पोटतिडकीने समाजाची व्यथा सांगत होता. सुरूवातीला मेळाव्यास जेमतेम दोनशेचं लोक असतील,पण भाषण जसजसे रंगात आले, तेव्हा मोठ्या दिसणाऱ्या मैदानावर पाय ठेवायला जागा नव्हती. ते भाषण होते, धनगर समाजाची मुलूख मैदानी तोफ स्व.बी.के. कोकरे यांचे!
कोकरे साहेबांच्यामुळे समजले इतिहास विसरलेल्या समाजाचे नेतृत्व करणे किती कठीण काम आहे. ते काम अतिशय ताकदीने कोकरे साहेब करत, हे लक्षात आल्यावर आम्ही काहीजणांनी धनगर जमातीच्या कार्यात झोकून द्यायचे ठरवले. त्यात कामथचे दलितमित्र श्रीरंग वळकुंडे, गोरे मास्तर, लातूरचे संभाजी पाटील असे एकास एक जोडत गेलो,.काही दिवासात बी.के.कोकरे संपर्कातून तुटले म्हणा किंवा त्याकाळातील धनगर पुढाऱ्यांनी त्यांना व्यवस्थेच्या बाहेर बदनाम करून फेकले. त्यातचं पुन्हा नवी आशा निर्माण झाली,…कुर्ला कोर्टाच्या परिसरात बैठकीच्या गाळ्यात मा.स्वर्गीय गडदे मास्तर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या धनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून काम करू लागलो. तिथे काही मन रमले नाही.पण एक नवीन चेहरा बहुजनांच्या पोरांना खुणवू लागला होता. बहूजन समाज पार्टीचा हत्ती हळूहळू मनात घर करू लागला. मा.महादेव जानकर हे युगपुरुष मा.कांशीरामजीचे नेतृत्व स्विकारून काम करू लागले. दुसऱ्या बाजूला बी.के.कोकरेंची टीम घेऊन बंद पडलेल्या यशवंत सेनेचा रथ घेऊन ओढू लागले.
नव्या दमाची धनगरांच्या पोरांसह ,इतर ओ.बी.सी.घटक जोडत काम सूरू होते.भाऊसाहेब वाघासारखा सातारकरांच्या मनातला मराठा समाजाचा पोरगा जोरात काम करत होता. सोलापूरचे अर्जून सलगर , बारामतीचे बाळासाहेब कोळेकर, दशरथ राऊत, पुंडलीक मामा काळे, फलटणची टिमचं न्यारी- पै.बजरंग(नाना) खटके,पै.बजरंग गावडे, संभाजी गावडे, काशिनाथ शेवते, डॉ.देवकाते, सांगलीतून इंजि.अशोक बन्नेनवार,राहुल पुजारी अशी मोठी अनेक लोकं यशवंत सेनेचे वैचारिक काम करत होती.
फलटण तालुक्यातील दूधेभावी गावातील कार्यक्रमात मी घोषणा दिली होती.-
‘धनगर, माळी, मुसलमान यशवंत सेना के तिन कप्तान!’
ती घोषणा पुढे खुप गाजली होती. यशवंत सेनेचे काम सूरू असताना बहूजनहृदय सम्राट श्री.महादेव जानकर यांना २००५ साली आपल्या हक्काच्या राजकिय विचारपीठाची गरज वाटली, म्हणून कुर्ला येथे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली.सुरवातीला यशवंत सेना म्हणजेच रा.स.प.होती.नंतरच्या काळात मा.महादेव जानकर यांनी पायात भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला बघतबघत पक्ष वाढत होता.
सांगलीतील आटपाडी तालुक्यातील झरे गावी एक तरूणांने रा.स.प.च्या शाखेचे दणक्यात उद्घाटन केले. तेव्हा गावात प्रस्थापित असणाऱ्या मंडळीने ह्या पोराला गंमतीत घेतले होते.पण ह्या तरूणाच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. हा तरूण खाजगीत बसल्यावर बोलायचा आपल्याला आमदार व्हायचं आहे.पुन्हा ह्या पट्ट्याच्या कार्यकर्त्यांनी २६ वा वाढदिवसाच्या निमित्ताने आपली क्षमता ओळखून झरे येथे शेतकरी मेळावा आयोजित केला. कार्यक्रमासाठी विविध गावचे सरपंच, कार्यकर्ते,खूद्द जानकर साहेब देखील आले आणि कधी नाही अशा बातम्या छापून आल्या.तेथून मागे वळून पाहिले नाही.ते आजतागायत गड्याची गाडी वेगाने धावत आहे.
परंतू हा प्रवास करताना प्रचंड संघर्ष वाट्याला आला.आपले म्हणणारे नातेवाईक असो किंवा गावागावांतील गावपुढारी! त्याच्यासोबत फिरणाऱ्यांना माथेफिरू म्हणून हिणवत होते.परंतु, इरेला पेटलेला हा नवतरूण नेता सांगोला,सांगली,कोल्हापूर,सोलापूर, बारामती,कुठेही कार्यक्रमाला बोलवले तर कोणतीही अपेक्षा न ठेवता हजर! प्रसंग कसाही असो कार्यकर्त्याला संकट आले, पहाटे चार वाजता देखील तिथे हजर झालेलं मी पाहिले आहे.
माणसं जोडत असताना गावागावातील पुढारी तर विरोध करतचं होते. पण तालुक्यातील मंडळींनादेखील डोकेदुखी वाटू लागली होती. २००९ साली रिडालोसमधून निवडणूक लढवली आणि लोकांनी नगण्य समजलेल्या पडळकरांनी १९ हजारपेक्षा अधिक मते घेतल्याने निवडूण येणारा उमेदवार आर.आर.पाटील यांचा माणसबंधू चितपट झाला आणि तालूक्यासह जिल्ह्यात गोपीचंद पडळकर नावाच्या चर्चेला उधाण आले. तिथून पुढचा संघर्ष अंगावर शहारे आणणारा होता. जो नेता सफारी गाडी घेऊन फिरत होता, त्याच्यावर स्वतः च्या पार्टीतून निवडणूक येऊन सरपंच झालेल्या महिलेस हाताशी धरून १५०००/-(पंधरा हजार ) किंमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात गोवले.ह्यात दस्तूरखुद्द तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील हे होते. त्या खोट्या गुन्ह्यांत माझ्यासह गोपीचंद पडळकरांचे सहा कार्यकर्ते व त्या महिलेचे तीन दीर होते.तरीही पडळकरांचा संघर्ष थांबला नाही.
पडळकरांनी रा.स.प.सोडून भा.ज.प.च्या तिकाटावर २०१४ निवडणूक लढवली. तालुक्यात संस्थांचे जाळे असणारे अमरसिंह देशमुख यांच्यापेक्षा अधिक मते घेतल्याने त्यांच्या जिव्हारी लागले.निवडणूकीत पराभवाची सल अमरसिंह देशमुख यांना नव्हती, होती ती फक्त चहाची टपरी नसणाऱ्या पोरापेक्षा तालुक्यात मतदान कमी पडल्याची सल मनात होती. परंतू अमरसिंह देशमुख हे तालुक्यातील इतर नेत्यांपेक्षा हुशार म्हणा किंवा धूर्त राजकारणी आहेत हे संपूर्ण तालूक्याला माहीत आहे. त्यांनी जि.प.निवडणूकीच्यावेळी मा.गोपीचंद यांची ताकद ओळखून दोन पाऊले मागे सरून दोघांनी निवडणूक लढवली आणि आटपाडी तालुक्यातील सर्व जि.प.सदस्य निवडून आणले.पंचायत समीतीची सत्तादेखील बहुमताने राखली.
पडळकर भारतीय जनता पार्टीत असल्याने त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेकडून टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे काम मंजूर करून घेतले. त्याचबरोबर टेंभूची आशिया खंडातील सर्वात मोठी बंदपाईप लाईन योजना मंजूर केली. नंतर धनगर आरक्षण अंमलबजावणी आंदोलनामुळे त्यांनी भा.ज.प. बरोबर देखील फारकत घेतली. धनगर आरक्षण अंमलबजावणी आंदोलन ताकदीने उभे करण्याचा प्रयत्न केला. १ ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाहीर यांच्या जयंतीदिवशी पुणे येथे मेळावा घेऊन सुरूवात केली.त्याच महिन्यात ३१ऑगस्ट रोजी भटक्या विमुक्त जमाती स्वतंत्र दिनाच्या दिवशी औरंगाबादच्या खासबाग ह्या ऐतिहासिक मैदानावर रेकॉर्ड ब्रेक सभा घेऊन सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला.
गुजरात येथील पाटीदार समाजाचे आंदोलन पेटवणारे हार्दिक पटेल यांना आरेवाडी येथील बिरोबा बनात आणून सहा लाख लोकांच्या विक्रमी उपस्थितीत अत्योच्च टोकापर्यंत जाऊन बिरोबाची शपथ घालून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारला भीती निर्माण केली. आरेवाडी येथील मेळाव्यातूनच त्यांनी ‘गो बॅक मोदी’चा नारा पुकारला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या थेट आव्हानामुळे महाराष्ट्रभर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. तदनंतर महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढून आरक्षणाचा प्रश्न आणखी धगधगता केला.याची परिणीती म्हणून मुंबई सानपाडा येथे तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे आदिवासी जमातीला ते धनगर जमातीला असे उद्घोषित करून फलस्वतीत आणले. त्याचबरोबर यासंदर्भात धनगर व धनगड याबाबत न्यायालयात द्यावे लागणारे प्रतिज्ञापत्र ही सरकारमार्फत देण्यात आले.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकून त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीमधून लक्षवेधी निवडणूक लढवली. संपूर्ण महाराष्ट्र ही निवडणूक उघड्या डोळ्याने पहात होता.
लक्षवेधी मतदान व धनगर जमातीच्या योजनांची पूर्तता यातून त्यांना पुन्हा भाजपच्या नेतृत्वाने ओढून घेतले व थेट बारामतीतून उमेदवारी जाहीर करून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का दिला. पराभवाची कल्पना असतानाही केवळ पक्षादेश आणि पवारांसंगे झुंज देण्याची संधी यातून त्यांनी ही लढाई पार पाडली.
आमदारकीच्या आशा धुसर असतानाही व राज्यात वैचित्र्यपूर्ण घडामोडी घडत असताना केवळ मोजक्याच जागांमुळे रथीमहारथींच्या अस्तित्वाला धक्का लागत असतानाही अनपेक्षितपणे त्यांना विधान परिषदेची भाजपने लॉटरी लावून दिली. एवढ्या दिग्गज नेत्यांतून उमललेले हे कृष्णकमळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिले व तोंडात बोटे घातली.
विधान परिषदेची मिळालेली संधी, त्या कामात त्यांनी कधीही कसूर केली नाही. ज्या-ज्या ठिकाणी त्यांना प्रश्न मांडण्याचे किंवा समस्या सोडवण्याची संधी मिळेल त्या-त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण क्षमतेने त्या समस्यांना न्याय दिला आणि महाराष्ट्रातील तमाम वंचित, दुर्लक्षित,उपेक्षित, गोरगरीब लोकांना आपलेसे करून ठेवले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, यासारखे एक ना अनेक प्रश्न त्यांनी जिवाभावाने हाताळला,त्यामध्ये त्यांचे नेतृत्व लक्षवेधी होते.
अतिशय खडतर व कष्टप्रद स्थितीतून जडणघडण झालेले हे व्यक्तिमत्व संबंध महाराष्ट्राला भविष्यकाळात प्रकाशमय ठेवण्यासाठी सतत धडपडत आहे. अहोरात्र भटकंतीतून त्यांनी बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी आपला देह झिजवण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे. अशा या महान महाराष्ट्रविभूतीला जन्मदिनाच्या निमित्ताने अनंत कोटी शुभेच्छा! त्यांचे उत्तरोत्तर कार्य असेच भरत राहो, त्यांना समृद्ध,आरोग्यदायी,भरभराटीचे दीर्घायुष्य लाभो व यशाची शिखरे पादाक्रांत करीत दैदिप्यमान वाटचाल होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
-भाई शिवराम मासाळ,
संस्थापक,बळीराजा फाऊंडेशन मो.9922173284

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद