उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षिका मनिषा पांढरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने गौरव

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

‘जनसेवेपायी काया झिजवावी! घाव सोसोनीया मने रीझवावी!’ या ओळींना सार्थ करणाऱ्या आणि माळशिरस तालुक्याची गौरवशाली शैक्षणिक परंपरा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी लाॕकडाऊन काळात आॕनलाईन व आॕफलाईन अध्यापन करून शिक्षणाची गंगा जिल्हाभर पोहचवणा-या आदर्श शिक्षिका श्रीम. मनिषा मुकेश कोळी (पांढरे) यांना सहाय्यक पोलिस आयुक्त महाराष्ट्र पोलीस सोलापूर दिपक आर्वे, प्रा. डॉ. अनिल देशमाने, भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बार्शी, बापूराव जमादार, शिक्षण विस्तार अधिकारी,जिल्हा परिषद सोलापूर, संजय पवार (पत्रकार) संस्थापक अध्यक्ष अविष्कार फाऊंडेशन यांच्या शुभहस्ते २०२२ चा अविष्कार सोशल अॕन्ड एज्युकेशनल फौंडेशनचा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका’ या पुरस्काराने सोलापूर येथे सन्मानीत करण्यात आले.
अविष्कार फौंडेशन इंडिया-महाराष्ट्र राज्य ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला -क्रिडा, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रात गेले १५वर्षे झाली कार्य करत आहे. ५ सप्टेंबर या शिक्षकदिनाचे औचित्य साधून २०२२ या वर्षीचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच डाॕ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोलापूर येथे संपन्न झाला.
श्रीम.मनिषा पांढरे या जि.प.प्रा आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजवर राज्यस्तरीय अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी राज्याला दिले आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेली ‘बालरक्षक’ म्हणून केलेली भुमिका याविषयी अनेक शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
कोरोना महामारीत संपूर्ण विश्व ठप्प झाले आणि शिक्षणाची गजबजलेली मंदिरे बंद झाली. तरीही या ध्येयवेड्या शिक्षिकेने आपल्या संगणकीय ज्ञानाचा वापर करून इयत्ता पहिलीच्या वर्गाचे online अध्यापन सुरू केले. यात जिल्हाभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले.अनेक अधिकारी वर्गाची मुले तसेच वाडीवस्तीवरील मुलांना शिक्षण सुलभतेने मिळाले.
आपला जीव धोक्यात घालून आॕफलाईन विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जावून पाठपुरावा केला. डिजीटल शिक्षण प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून स्वतःच्या नावे वैयक्तिक कर्ज घेवून विद्यार्थ्यांना डिजीटल टॕब उपलब्ध करून दिले. शिक्षणाचा वसा घेतलेल्या या सावित्रीच्या लेकीने स्वतः आणि पती मुकेश कोळी दोघांनी तंत्रस्नेही असल्यामुळे केंद्र यशवंतनगर व केंद्र -धर्मपुरी येथील केंद्रातील अनेक online कामे व उपक्रम हे आपल्या वैयक्तिक जीवनातील कुटूंबासाठीचा वेळ देवून करून तालुक्याच्या शैक्षणिक कार्याचा आलेख उंचावण्यासाठी मदत केली आहे. आपल्या कामावर व आध्यात्मिक जीवनशैलीवर नितांत श्रद्धा असलेल्या त्यांच्या या कार्याची दखल घेवून आविष्कारने त्यांचा सन्मान केला आहे.निश्चित त्यांच्या या सन्मानाने माळशिरस शिक्षण विभागाचा नावलौकिक वाढला आहे.तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, माजी शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, मुख्याध्यापक शिवलिंग नकाते व सर्व शिक्षक बंधुभगिनींच्या प्रेरणेमुळेच हे यश मिळाले असे त्यांनी सांगितले.संपूर्ण जिल्हाभरातून मनिषा पांढरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
‘चिरा चिरा हा घडवावा! कळस किर्तीचा चढवावा! या ओळींना न्याय देण्या-या विद्यार्थी प्रिय शिक्षिका मनिषा पांढरे यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम व अभिनंदन!