‘त्या मायमाऊली’च्या सन्मानाची उगवली पहाट!

आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथे विधवा अनिष्ट प्रथेला मूठमाती!

पाटील कुटुंबाच्या इतिहासातील सुवर्णपान -शिलेदार

पतीच्या निधनानंतरही कायम ठेवलं सौभाग्याचं लेणं ! पाटील कुटुंबाच्या इतिहासातील सुवर्णपान
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथे विधवा अनिष्ट प्रथेला मुठमाती देण्यात आली. विविध सामाजिक महंतींच्या प्रयत्नातून कुटुंबाची जनजागृती करीत अनिष्ट रूढी-परंपरा झुगारीत काळ्याकुट्ट जीवन प्रवासाचा मार्ग प्रकाशमय करण्यासाठी पतीच्या रक्षाविसर्जनानंतरही सौभाग्यालंकाराचं लेणं कायम ठेवलं. आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी या गावाने व पाटील कुटुंबाने समाजापुढे मोठा क्रांतिकारी व कृतिशील आदर्श समाजातील प्रमुखांच्या मदतीने निर्माण केला आहे.
बोंबेवाडी हे गाव सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील पूर्वेकडील शेवटच्या टोकाचे व सोलापूर जिल्हा सरहद्दी नजीकचे गाव ! धोंडी दादा पाटील यांनी या गावात अनेक वर्षे पोलीस पाटील म्हणून कामकाज केले. तसे विभुते हे त्यांचे आडनाव. पण पोलीस पाटील असल्यामुळे आडनाव पाटील असे झाले. त्यांच्याच कुटुंबात असणारे त्यांचे पुढील पिढीचे वारसदार पितांबर नारायण पाटील. ते एक अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व होते.आयुष्यात कधीही,कोणतेही व्यसन न केलेले पितांबर लोकांनी रागावलेले कधी पाहिले नाहीत किंवा कुणाशी कधी भांडले नाहीत, इतके ते सुगुणी व्यक्तिमत्त्व होते. आपल्या काळ्या आईशी-धरणीमातेशी- त्यांची घट्ट नाळ जोडली होती. त्यामध्ये ते सदैव गर्क असायचे.त्यांनी शेतीक्षेत्रात अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते. प्रयोगशील शेतकरी म्हणून ते नावारुपास आले.
परंतु नियतीने त्यांच्या आदर्शात्वाची परीक्षा पाहण्यासाठी काही वेळा हृदयविकार, त्यातून बायपास सर्जरी तर एखदा हार्निया यासारख्या आजारांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या. त्यांची हार्णियाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अगदी निर्व्यसनी, सत्वशील, सदाचारी युवक म्हणून सर्वांच्या नजरेसमोर असताना त्यांच्या शरीराला आजार स्पर्श करतोच कसा? अशीही डॉक्टरांची भावना होती. परंतु नियतीच्या खेळापुढे त्यांना हार मानावी लागली. वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली.अख्या गावाने, नातेवाईक व मित्रमंडळींनी यावेळी हळहळ व्यक्त केली.
एक इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला असलेली व दुसरी सातवीमध्ये शिकत असणारी त्यांची सुकन्या आणि दहावीच्या वर्गात शिकणारा चिरंजीव आपल्या पितृप्रेमाला पोरका झाला, तर आयुष्यभराची साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनीचे जीवन हे काळेकुट्ट अंध:कारमय बनले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर अचानक कोसळला, त्याचबरोबर भविष्यातील सुखी स्वप्नांचा भंग झाला. क्षणात त्यांचे जीवनविचार लुळे पडले.
‌ परंतु या आघातावर मात करण्याचे सामर्थ्य दिले ते प्रामुख्याने गावचे माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन आणि गावाचा गावगाडा सांभाळणारे राजेंद्र विभुते, तसेच सरपंच अभिमन्यू विभुते,पितांबरचे चुलते बाळासाहेब पाटील, विधवा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लताताई बोराडे आणि क्रांतीपर्वाची सुरुवात स्वतः करावी म्हणून पुढे सरसावलेल्या अध्यापिका सौ.मंगल विभुते व आदींनी!
पितांबर यांच्या निधनानंतर रूढी परंपरेप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु जीवनात काळाकुट्ट अंधार दाटलेल्या एका स्त्री मनाला पारतंत्र्यात लोटून तिला विधवेचं जीणं जगताना जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागतील, या भावनेची सल सतत बोचणाऱ्या राजेंद्र विभुते, बाळासाहेब पाटील,अर्जुन विभुते, अभिमन्यू विभुते, लताताई बोराटे व अन्य जाणत्या मंडळींनी कुटुंबाचे प्रबोधन करण्याची खुणगाठ बांधली. या विधवा अनिष्ट रुढीतून या मायमाऊलीची सुटका करण्यासाठी पावले उचलली.यासाठी सोसायटीचे माजी चेअरमन व पितांबरचे चुलते बाळासाहेब धोंडी पाटील, पांडुरंग शेजाळ, अंगणवाडी सेविका सौ.नम्रता विभुते,पांडुरंग विभुते, दादासाहेब मोटे, सुधीर विभुते,दिगंबर पाटील, छाया पाटील, मंदाकिनी पाटील, अनिल विभुते, बाळासाहेब विभुते, तात्यासाहेब विभुते, पितांबरचे पंढरपूर येथील मामा हरिदास बडके गुरुजी, सुनील विभुते यांनी विधवा अनिष्ट प्रथेला मूठमाती देऊन रुपालीच्या जीवनात मांगल्य व नवचैतन्य निर्माण करून तीन मुलाबाळांचा खंबीर पाठीराखा बनवण्याचा निर्धार केला.
पितांबरची आई व रुपालीची सासू केशरबाई पाटील यांच्याकडे हा विचार मांडला. त्यांना जुन्या अनिष्ट प्रथांचे दुष्परिणाम व नव्याने रुजविण्याच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्व पटविले. त्यांनीही या क्रांतिकारी विचारांना कोणताही संकोच न बाळगता आपल्या पाटील कुटुंबाला साजेसा क्रांतिकारी होकाराचा निर्णय दिला, परिवर्तनवादी विचारांच्या शिलेदार ठरल्या आणि त्यातून आटपाडी तालुक्यात पाटील घराण्याच्या आदर्शाच्या इतिहासाच्या सुवर्णपान सर्वांनी गिरवले.
रक्षाविसर्जनाच्या दिवशी परंपरेप्रमाणे पसायदान व इतर धार्मिक विधी चालू असतानाच पितांबर यांची पत्नी रूपाली यांना हळदीकुंकू लावण्यात आले, तसेच त्यांचा सुवासिनीचा मान आणि सौभाग्य अलंकाराचे लेणं कायम ठेवण्यात आलं. त्याचबरोबर घरी आल्यानंतर सुमारे ४०० महिलांनी रूपाली यांना हळदी-कुंकू लावून सौभाग्याचा मान कायम ठेवल्याचे सामाजिक परिवर्तनाचे शिक्कामोर्तब केले. बोंबेवाडीच्या पाटील कुटुंबाचे हे कार्य सर्वांनी मनोमनी कौतुकास्पद मानले.


या सर्व प्रक्रियेत सौ.मंगल विभुते यांनी या क्रांतिकारी कार्यामध्ये आपली खूप मोठी भूमिका बजावली.शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत एक संस्कारक्षम पिढी घडवीत असतानाच समाजामध्येही क्रांतीची भिजेल रुजली पाहिजेत, या विचारांची त्यांनी पेरणी केली. या घटनेतून त्यांनी आपल्या निकट उद्भवलेल्या प्रसंगातून प्रारंभ करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. त्यासाठी त्या सर्व प्रयत्नात सर्वसमवेशक प्रयत्नशील राहिल्या. पती निधनानंतर भविष्यात पत्नीला सुवासिनी म्हणून समाजानेही संकोचपणे स्वीकारावे, संक्रातीच्या सणाला ओवासणे त्याचबरोबर सुवासिनीच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांना मानपान करणे, सर्वसमावेशक धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांना समतेची व सन्मानाची वागणूक देणे तसेच सुवासिनीचा मान देणे, त्यांना विधवा अनिष्ट प्रथेच्या विचारांचा मनामध्ये स्पर्श कोणी करू नये अशा पद्धतीचे जनजागृती व संरक्षण देणे, समाजामध्ये आव्हान असलेल्या व रुढी-परंपरांना स्विकारणाऱ्या व्यवस्थेपुढे यशस्वीता प्राप्त करणे, यासारख्या समतेच्या आणि समानतेच्या सामाजिक विचारांच्या त्या पाईक ठरल्या. जीवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या एका मायमाऊलीला तिच्या आयुष्यात तेजस्वी प्रकाश फुलवण्याचा दीपस्तंभ निर्माण केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या सासर्‍यांनी सती जाऊ दिले नाही आणि त्यांना सन्मानाचे जीवन बहाल केले, त्या राज्यकर्त्या झाल्या, हा ऐतिहासिक आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी अशी आवाहन त्यांनी समस्त जणांना केले.


आटपाडी तालुक्यांमध्ये विधवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून लताताई बोराडे या सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा वारसा पुढे चालविणाऱ्या स्त्री-शिक्षिका विधवांच्या सन्मानासाठी गेल्या ३० वर्षापासून मोठी क्रांतिकारी चळवळ चालवित आहेत. पती निधनानंतर असह्य जीवन जगणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांनी सन्मानाचा आधार देऊन त्यांच्यासाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, सौभाग्य अलंकार लेण्याचा कार्यक्रम घेण्याबरोबरच समाज मनामध्ये मत परावर्तन करण्याची मोठी चळवळ सातत्याने सुरू ठेवली आहे. यासाठी त्यांना अनेक खटेटोमके खावे लागले आहेत. पारंपरिक अनिष्ट असणारी परंपरा नष्ट करण्यासाठी पावले टाकताना त्यांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले आहे. पती निधनानंतर एकाकी पडलेल्या महिलांच्या त्या आधार बनल्या आहेत. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याची राज्यभर ठिकठिकाणी दखल घेतली जात आहे. पतीचे निधन होते यात त्या पत्नीचा काय दोष? तिच्यावर वैधव्याचा हा सामाजिक अत्याचार कशासाठी? पती निधनानंतर ती कुटुंबाचे सर्व कर्म सुरळीतपणे पार पाडते. त्यामुळे ती विधवा नसून तिला ‘सक्षम महिला’ संबोधावे, असा आग्रह त्या सुजाण समाजासमोर सातत्याने धरतात.