प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी व मागण्यांबाबतचे निवेदन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानच्या आटपाडी येथील सुकाणु ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने तहसीलदार यांचेमार्फत सांगलीचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चांडवले, आटपाडी तालुका अध्यक्ष व्ही.एन.देशमुख, सचिव दत्तात्रय मोकाशी, उपाध्यक्ष नंदकुमार राक्षे, व्ही.एम. देशमुख, रामभाऊ सोनवणे, विठ्ठल देशमुख, भास्कर जाधव, नंदकुमार देशमुख, हरी विठ्ठल रावळ, सौ.गुलशन वंजारी, श्रीमती विजया चांडवले आदी ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी, तालुकास्तरावर वृद्धाश्रम असावा व तो चालविण्यासाठी संघटनेला अनुमती मिळावी, आटपाडी तालुक्यामध्ये विरंगुळा केंद्रासाठी जागा उपलब्ध व्हावी, मासिक बैठकीसाठी शासनाच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून द्यावी, ज्येष्ठांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राधान्यक्रमाने उपचार व्हावा, यासंदर्भात संबंधित आरोग्य यंत्रणेला सूचना द्याव्यात, या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार शिंदे म्हणाले, आपल्या मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवून त्याबाबत सकारात्मक सहकार्य करु.
आटपाडी तालुक्यातील विविध शासकीय विभागातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची ज्येष्ठ नागरिक संघटनेबरोबर त्रैमासिक बैठक घडवून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व प्रश्नांवर उपाययोजना करणेबाबत विचारविनिमय केला जावा,अशी मागणी सल्लागार अरविंद चांडवले यांनी मांडली.
या मागण्याबाबतच्या निवेदनाच्या प्रती तहसीलदार यांच्यासह खानापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद