अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्य चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी प्रतिवर्षांप्रमाणे याही वर्षी जत व मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या ३२ गावाला श्री ची मूर्ती देण्यात आली.
हभप तुकाराम बाबा महाराज यांनी गुरू श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून मंगळवेढा तालुक्यात तर २०१९ पासून जत तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ राबविणाऱ्या गावांना श्री ची मोफत मूर्ती भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. अकरा वर्षात हजाराहून अधिक श्री च्या मुर्तीचे वाटप जत व मंगळवेढा तालुक्यात करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठीण काळानंतर यंदा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाही तुकाराम बाबा यांनी गावात एकोपा रहावा, गावातील तरुण वर्ग हेवेदावे, इर्षा बाजूला ठेवून समाजकार्यासाठी मंडळाच्या माध्यमातून एकसंघ व्हावेत यासाठी जतसह मंगळवेढा तालुक्यात जे गाव एक गाव एक गणपती मोहीम राबवेल त्या गावाला मोफत श्री ची मुर्ती देणार असल्याचे जाहीर केले होते.
जत तालुक्यातील गुडडापूर, जाडरबोबलाद, आसंगी, भिवर्गी, मोटेवाडी, घोलेश्वर, धूळकरवाडी, सालेकिरी, अंकलगी, करजगी, लमाणतांडा उटगी,बोर्गी खुर्द, कोसारी, बनाळी, मेंढेगिरी, तिप्पेहळळी, बागेवाडी, गोंधळेवाडी व अन्य गावे तसेच मंगळवेढा तालुक्यात श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने श्री च्या मुर्त्या वाटप करण्यात आल्या.
बागडेबाबांची आज पुण्यतिथी; विविध कार्यक्रम
श्री संत बागडेबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्य जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे हरिमान सप्ताह, चिखलगी भुयार मठ येथे श्रीमत भागवत कथेस नियोजन २६ ऑगस्ट पासून करण्यात आले आहे. शुक्रवारी हरिनाम सप्ताह व भागवत कथेचा समारोप होणार आहे. दुपारी बारा वाजता काल्याचे किर्तन व त्यानंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद