भटके विमुक्तांचे प्रश्न आणि आजचे वास्तव ३१ ऑगस्ट या भटके विमुक्त दिनानिमित्त विशेष लेख

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत, त्यानिमित्ताने देशभर आजादी का अमृत महोत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा होत आहे. विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात आहेत. हर घर तिरंगा मोहिमही राबविली गेली. मात्र हे सर्व सुरू असताना या देशातील भटके विमुक्तांच्या पदरात नेमके काय पडले हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे येऊन भटके विमुक्त ज्या तारेच्या कुंपणात बंदिस्त होते. त्यांना मुक्त केले. त्याला सेटलमेंट असे म्हटले गेले. म्हणजेच इतर भारतीयांना तब्बल ५ वर्ष नंतर स्वातंत्र मिळाले. त्यालाही आता ७० वर्षे पूर्ण झाली. मात्र गरीब भटक्या-विमुक्तांची कुठलेही प्रश्न सुटले नाहीत उलट दिवसेंदिवस त्यांच्यावर येणारी संकटे वाढत आहेत गेली सत्तर वर्ष भटके-विमुक्त समाज केवळ रहिवासी दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड मिळवण्यात सुद्धा यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी असणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, आरक्षण, घरकुल, कर्ज, अनुदान, आर्थिक मदत या सवलती केवळ कागदावर आहेत. भटके विमुक्त मात्र या सवलती पासून कोसो दूर आहे हे आजचे वास्तव आहे.
या परिस्थितीला जबाबदार कोण ? या प्रश्नावर चर्चा करायची ठरली तर सरकार, प्रशासन, समाजातील पुढारी आणि इथली जात व्यवस्था याला जबाबदार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण सत्तेवर येणाऱ्या कुठल्याही पक्षाने किंवा पुढाऱ्यांनी भटके विमुक्तांचा वापर केवळ ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणुकीतील मता पुरताच केला आहे. त्याला राज्यकर्ते जसे जबाबदार आहेत तसेच भटका विमुक्त समाजातील निवडणुकीच्या वेळी विकले जाणारे पुढारी देखील जबाबदार आहेत. शिकून-सवरून मोठे झालेल्या अधिकारी किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी कधीही आपल्या समाजबांधवांचा विचार केला नाही आणि आजही करीत नाही.
भटक्या-विमुक्तांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी फक्त शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. परंतु दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न आणि दारिद्र, अज्ञान, भटकंती आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे भटके-विमुक्त समाज अजूनही मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्यांना बोटाला धरून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. त्यामुळे केवळ उदरनिर्वाहासाठी त्यांना लाचारी, गुलामी, लांड्या-लबाड्या वेळप्रसंगी भावनिक फसवणूक आणि छोट्या मोठ्या चोर्‍या माऱ्या कराव्या लागतात हे ही सत्य नाकारून चालणार नाही.
पोटासाठी सतत भटकंती करावी लागते. म्हणून यांना ग्रामपंचायतीकडून रहिवासी दाखला, जन्म-मृत्यूचा दाखला, नागरिकत्वाचे पुरावे मिळत नाहीत. प्राथमिक स्वरूपातील कागदपत्र नाहीत म्हणून जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड व इतर शासकीय सवलतीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजातील अठरापगड जाती जमातींनी आता आपले राहण्याचे ठिकाण निश्चित केले पाहिजे. तिथल्या ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांचा विश्वास संपादन करून हे कागदपत्रे मिळवली पाहिजेत.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्व मुला-मुलींना जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले पाहिजे . आपले आरोग्य, स्वच्छता याकडे लक्ष दिले पाहिजे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन उपचार केले पाहिजे. दारू, मटका, गुटका, विडी, सिगारेट, तंबाखू ही व्यसने व अंधश्रद्धा सोडून देऊन हाताला मिळेल ते काम केले पाहिजे. दारोदार भीक मागून जगण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर आणि कौशल्यावर जगले पाहिजे. भटक्या विमुक्तांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. भटक्या विमुक्त समाजातील पुढारी, शासन आणि प्रशासनाने त्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे.
रोजगारासाठी ज्या क्षेत्रात आपले कौशल्य आहे तो काम धंदा केला पाहिजे. कुठलेही काम केल्यावर पैसे आपोआप मिळतीलच मिळालेल्या या पैशातून बचतीची सवय झाली पाहिजे. स्वतःला इतरांपेक्षा कमी न लेखता, सर्वांना समान मानून समाजात वागले पाहिजे. आपले हक्क आणि कर्तव्य समजून घेतली पाहिजेत. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल करणे त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करणे, वेळप्रसंगी शासन दरबारी लोकशाही मार्गाने लढा देणे ही शिकले पाहिजे. तुमच्या भल्यासाठी कोणीही मसिहा पुढे येणार नाही, तर आपला मसिहा आपल्यालाच व्हावा लागेल याची खूणगाठ बांधली पाहिजे.
भटक्या-विमुक्तांना शिक्षण, रोजगार , व्यवसाय, उद्योग धंदा यासाठी कुठल्या व किती सवलती आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे. सामूहिकपणे त्या सवलतींचा लाभ घेतला पाहिजे. शाळेत प्रवेश मिळण्यापासून ते नोकरी मिळविण्यापर्यंत हा लढा द्यावा लागेल. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या राजकीय लोकप्रतिनिधींनी म्हणजेच सरकार आणि ग्रामसेवक यापासून राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंतच्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भटके-विमुक्त यांविषयी सहानुभूतीच्या आणि कर्तव्य भावनेतून त्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्या साठी असणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून दिला पाहिजे. यासाठी बरेचदा चाकोरीबाहेर येऊन काम करावे लागेल याचीही तयारी ठेवली पाहिजे.
भटक्या विमुक्तांसाठी काय योजना आहेत ? व त्यांचा लाभ कसा घेता येईल याबाबतची प्राथमिक माहिती तरी त्या समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यापैकी प्राथमिक स्वरूपातील माहितीचा या ठिकाणी उल्लेख होणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, विद्यानिकेतन, बालगृहे, ऊसतोड मजुरांच्या शाळा, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, भविष्य निर्वाहभत्ता, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन, शासकीय निवासी विद्यालय व महाविद्यालये, वाहन चालक प्रशिक्षण योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मच्छीमारांसाठी असलेली घरकुल योजना, गृहनिर्माण संस्थांना वित्तीय सहाय्य, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा योजनांचा अभ्यास करून त्यासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केला तर या योजनांचा लाभ भटक्या-विमुक्तांना मिळवून देणे सहज शक्य आहे.
अलीकडच्या काळात भटक्या-विमुक्तां वर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. 2015 मध्ये नागपूर जिल्ह्यातून या घटनांना सुरुवात झाली. साडी नेसून पैसे मागणाऱ्या चार बहुरूप्यांची अमानुषपणे चोर समजून हत्या करण्यात आली. त्यानंतर 2018 मध्ये धुळे जिल्ह्यातील राईनपाडा मध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजातील ५ तरुणांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तर 2020 मध्ये पालघर जिल्ह्यात भटक्या-विमुक्त समाजातील २ साधूंची जमावाने हत्या केली.
भटक्या विमुक्त जातींवर गुन्हेगारांचा शिक्का आहे त्यामुळे त्यांना गावात वस्ती करून राहता येत नाही. गावातील धन दांडगे लोक त्यांना गावात येऊ देत नाहीत. गावा बाहेर पाल टाकून त्यांना राहावे लागते. पोटासाठी सतत भटकंती करावी लागते. त्यामुळे शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणून रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून पैसे नाहीत. आणि पैसे नाहीत म्हणून अठरा विश्व दारिद्र्यात भटका विमुक्त समाज कितपत पडला आहे. या समाजाला शिक्षण रुपी प्रकाशाचा सूर्य दाखवला तरच त्यांच्या जीवनात विकासाची पाहत उजाडेल हे त्रिकाल बाधित सत्य आहे. त्यासाठी भटक्या विमुक्त समाजातील पुढारी, आधिकारी, कर्मचारी व शिकलेल्या तरुण तरुणींनी पुढे येऊन समाजाचे प्रश्न सोडविले पाहिजेत. आणि तशी प्रतिज्ञा ३१ ऑगस्ट या भटके विमुक्त दिनानिमित्त सर्वांनी केली पाहिजे.
ॲड.डॉ.अरुण जाधव
मो. 9422226066