माळशिरस प्रतिनिधी /संजय हुलगे :
मित्रपक्षाच्या वतीने गायीच्या दुधाला सरसकट १० रु. लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदानाच्या मागणी करिता आज माळशिरस तहसील कार्यलय येथे नायब तहसीलदार तुषार देशमुख व नायब तहसीलदार एन काळे यांना भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते भाजपा ,जेष्ठ नेते के के पाटील ,तालुका अध्यक्ष सोपानराव नारनवर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, रयत रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गोरड ,रिपाई तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले , राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा अध्यक्ष रणजित सूळ, हनुमंत सूळ ,सोमनाथ भोसले, किरण धाईजे, सुरेश तरंगे ,मुक्ता कोरबु, बाळासाहेब वावरे , युवराज वाघमोडे, शहाजी सरगर ,प्रवीण काळे ,महेश सोरटे ,सोमनाथ भोसले, बशीर काझी, हनुमंत कर्चे, भैय्या चांगण ,विनोद थिटे, दत्ता कर्चे , ,डाॅ अक्षय वाडकर, महादेव कावळे, डाॅ पताळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये १५० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी ३० लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. ३० लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.

या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे.
गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी बांधव १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलन करीत आहोत.
या निवेदना सोबत गायीचे पवित्र दुध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्याकरिता पाठवीत आहो. या पवित्र दुधाचे प्राशन करून आपण न्याय बुद्धीने वरील सर्व मागण्या मान्य कराल एवढीच अपेक्षा असे आहे.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा