
पुरोगामी महाराष्ट्रात विधवा सन्मानाच्या क्रांतीचा पेटला महायज्ञ ! सर्व महिलांनीही घेतली ‘अशी’ प्रतिज्ञा!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची हे दुष्काळाने पाण्याच्या दुर्भिक्षाच्या झळा सोसलेले माणदेशी पट्ट्यातील गाव, जिथे सांगली,सातारा,सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या हद्दीचे मिलन घडते.याच दिघंची गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक विचारातून प्रेरित झालेल्या वाघमारे कुटुंबांनी प्रतिकूल परिस्थितीला वारुन आपल्या मुलाबाळांना नव्या ध्यासाचे शिक्षण दिले.त्यांच्या कष्टाच्या फलितातून घेतलेल्या शिक्षणाचे पुरोगामी विचारात परिवर्तन झाले.यातून महाराष्ट्राला नवा आदर्श देण्याची ठिणगी पडली. ज्ञानसागरात डुंबलेल्या त्यांच्या पुत्रांनीच आपल्या मातांनाच नव्या समतेच्या व सन्मानाच्या क्रांतीच्या महायज्ञाचे शिल्पकार बनविले. एकाच वेळी सहा मातांनी विधवा अनिष्ट रूढींना सुरुंग लावून सौभाग्याचं लेणं पुन्हा लेण्यास सुरुवात केली. समाज मनाचे बुरसटलेल्या विचारांना पायदळी तुडवून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील विधवा अनिष्ट रूढींना मूठमाती देण्याचा नवा इतिहास घडविणाऱ्या साक्षीदार बनल्या.
आज ३१ मे रोजी पतीचे निधन होऊन एक वर्षं झालं.या दिवशी शकुंतला तुकाराम वाघमारे यांच्या पतीच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनादिवशी विधवा प्रथा प्रतिबंध करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलून हळद-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. तसेच समाजातील विधवा महिलांनी हळद-कुंकू लावून प्रथा नष्ट करण्याची मुहूर्तमेढ रोवली.याप्रसंगी सर्व महिलांनी पती निधनानंतर बांगड्या न फोडणे,कुंकू न पुसणे,मंगळसूत्र न काढणे,जोडवी न काढणे बाबत प्रतिज्ञा घेतली. या विधवा महिलांना नंदकिशोर वाघमारे यांच्या परिवारामार्फत सौभाग्यचं लेणं म्हणून हिरवी साडी , हिरव्या बांगड्या, हळद-कुंकू करंडा व ओटीचे साहित्य भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी दिघंची येथील आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी स्त्रीला समान संधीचा,जगण्याचा अधिकार आहे, तसेच समाजातील अनिष्ट चालीरिती, कुप्रथा नष्ट करण्याची धाडसी पाऊल असल्याचे प्रतिपादन केले.तसेच सांगली जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सावंता पुसावळे व आटपाडी तालुका भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य प्रणव गुरव यांनीही यावेळी आपले मौलिक विचार व्यक्त केले. स्री ही पुरुषाची अर्धांगिनी आहे.तिला विद्रुप करण्याचा समाजाला कोणताही अधिकार नाही.त्या स्त्रीची इच्छा असेल तर तिला स्त्री व सौभाग्य अलंकार घालण्याचा पूर्ण अधिकार आहे,आज यांना काही स्त्रिया नावे ठेवतील,पण त्याच उद्या जयजयकार करतील. याप्रसंगी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज,राजाराम मोहन रॉय ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक परिवर्तनामधील अनेक उदाहरणे देण्यात आली. दिघंची गावचे सरपंच अमोल मोरे यांनी ग्रामपंचायत यांचे वतीने या अनिष्ट रुढीस विरोध करणाऱ्या या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विलास खरात,अरविंंद चांंडवले,संजय वाघमारे,विजय वाघमारे,बालक वाघमारे ,पोपट वाघमारे,कवी राहुल वाघमारे, सुरेश सावंत, सुभाष वाघमारे,अमित वाघमारे,भन्ते बाळासाहेब वाघमारे, संजय वाघमारे,बाबा वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक भिसे यांनी केले. ह्यूमन राईट साताराचे जिल्हा निरीक्षक नंदकिशोर वाघमारे
यांनी आभार मानले. कालकथित तुकाराम वाघमारे यांचे स्मृतिप्रित्यर्थ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.

या मातांनी स्वीकारलं सौभाग्याचं लेणं!
शकुंतला तुकाराम वाघमारे (वय ७२),
अंजना मधुकर वाघमारे (वय ५२),
शांताबाई संभाजी मागाडे (वय ८०),
वैजयंता गंगाराम भिसे (वय८३),
सुभद्रा भीमराव वाघमारे (वय५५),
माया बबन वाघमारे (वय६०)
या मातांना साडीचोळी देऊन त्यांना कुंकवाचा मान बहाल केला. हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कुंकवाचा करंडा, ओटीचे साहित्य देण्यात आले.
बालक हे स्थानिक परिस्थितीत उपजीविकेसाठी चालकाचा व्यवसाय करतात. तर त्यांचे धाकटे बंधू नंदकिशोर हे सातारा नगरपालिकेत प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून आहेत. या उभयतांनी त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमांसाठी आदल्या दिवशी गावात व समाजात निमंत्रण देत असताना ज्याठिकाणी विधवा माता-भगिनी आहेत, त्याठिकाणी अधिकचा वेळ देऊन या विषयाबाबत प्रबोधन केले व या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. पुण्यदिनाच्या दिवशी कार्यक्रम सुरू असताना त्यांना अधिक प्रबोधन करून मनोधैर्य निर्माण केले व विधवा अनिष्ट प्रथांमुळे होणारी अवहेलना
व यातना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील दिलेल्या समतेच्या व स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणणारी आहे, याविषयी जागृती केली.
आदल्या दिवशीच मनोतयारी झालेल्या या माता-भगिनींना कार्यक्रमात हळदी कुंकवाचा मान देत त्यांना हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कुंकवाचा करंडा व ओटीचे साहित्य देऊन सन्मानित केले.
समाजाच्या प्रथा आणि परंपरेने भरकटलेल्या विचारांना मूठमाती देताना परंपरेच्या जोखडातून अडकलेल्या महिलांना सुरुवातीला जरी हा प्रकार अवघडल्यासारखा वाटला असला तरी राज्यात ही सामाजिक चळवळ उभा राहत आहे आणि त्या चळवळीचे आपण सहभागी असल्याचे ऐतिहासिक साक्षीदार होत आहोत याचा अभिमान वाटला.

बालकाची वाणी,माता आचरणी !
त्यागीली विधवा अनिष्ट प्रथा जुनी,
अन् स्विकारली सौभाग्याची लेणी!
तुकाराम विठ्ठल वाघमारे यांचे गेल्या वर्षी ३१ मे रोजी कोरोनाने निधन झाले होते. त्यावेळी समाजात चालत आलेल्या रूढी परंपरेप्रमाणे त्यांची पत्नी शकुंतला वाघमारे यांच्या बांगड्या फोडल्या गेल्या, पायातील जोडवे काढली गेली, कुंकू पुसण्यात आले. गेल्या वर्षभरापासून त्या समाजातील अनिष्ट रूढी परंपरांला जखडून होत्या. परंतु महाराष्ट्रात सुरू झालेल्या विधवा अनिष्ट प्रथांना मूठमाती देण्याच्या चळवळीने प्रेरित होऊन त्यांच्या दोन मुलांनी स्वतःच्या आईचे मतपरिवर्तन केले. तसेच समाजातील अन्य पाच माता-भगिनींचेही परिवर्तन केले आणि या सामुदायिक चळवळीचे मानबिंदू ठरले.
” महिलांबाबत अनिष्ट रूढी,परंपरा एकविसाव्या शतकात सुद्धा पाळल्या जात आहेत. त्याला कुठेतरी छेद देऊन महिलांना जगण्याचा अधिकार आहे. तसेच घटनेने जगण्याचा समान अधिकार देण्यासाठी क्रांतिकारक विचाराने प्रेरित होऊन त्यांना नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक धर्मामध्ये स्त्रीला काहीतरी बंधनात अडकवलं जातं, ते नष्ट करण्यासाठी आणि तिला नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी पतीच्या निधनानंतर सुद्धा तिला सौभाग्याचा अलंकार लेण्याचा पूर्ण अधिकार आहे. याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी क्रांती करून नवीन युगाची सुरुवात केली. याच सावित्रीच्या लेकी एकविसाव्या शतकात नवीन युगाची सुरुवात करून ऐतिहासिक पाऊल उचलत आहेत. आज समाजात त्यांची कुचेष्टा होईल,परंतु हाच समाज उद्या त्यांचा जय जयकार करणार आहे .अशा या स्त्रियांना धीर देण्याचं काम समाजातील पुरुष वर्गानं व तरुणवर्गानं केलेलं आहे. तसेच त्यांच्या सुना व मुलींनी त्यांचे प्रबोधन केले आहे. ही प्रथा, रूढी नष्ट करण्यासाठी या रणरागिनींनी मोठ्या धाडसाने पाऊल उचलले आहे.समाज याचा आदर्श नक्कीच घेईन.अनिष्ट रूढी,परंपरा नष्ट करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे, इतिहास याची नोंद ठेवणार आहे.”- नंदकुमार वाघमारे

अहिल्या जयंती, पतीचे पुण्यस्मरण आणि सौभाग्याचा सन्मान याचा त्रिवेणी संगम योग!
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे, त्याचे औचित्य साधून आज राज्यातील ग्रामपंचायतींना विशेष ग्रामसभा घेऊन विधवा अनिष्ट रूढींना मूठमाती देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे सुचित केले होते. अहिल्यादेवी होळकर यांनी पती निधनानंतर तत्कालीन परिस्थितीत स्वतःला सावरून, भक्कमपणे उभे राहून स्त्री असूनही सक्षमपणे राज्यकारभार चालवता येतो याचा आदर्श घालून दिला व समाजमनात असणाऱ्या रुढींना छेद देऊन कुशल राज्यकर्त्या बनू शकतात असा पायंडा पाडला होता. त्यांच्याच जयंती दिवशी हा सौभाग्याचा मान पुन्हा लेण्याचा दिन आज उजडला हा पहिला योग आहे.
३१ मे रोजी गतवर्षी कोरोनाने शकुंतला वाघमारे यांच्या पतींचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरोगामी विचारांचे बीजारोपण करण्यात आले. दुष्काळी आटपाडी तालुक्यात नवविचारधारणांची सर्वोच्च पातळी गाठणारा आणि क्रांतीची बीजे रुजवणारा हा दुसरा योग ठरला.
याच दिवशी शकुंतला वाघमारे यांच्यासह एकूण सहा महिलांनी समाज मनातील अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन एकाच वेळी महाराष्ट्रातील ६ विधवा मातांनी सौभाग्याचा मानपान स्वीकारण्याची ही महाराष्ट्रातील क्रांतिकारी घटना असून ऐतिहासिक व सर्वात मोठी घटना ठरत असल्याचा हा तिसरा योग आहे. अशा तीन योगांचा त्रिवेणी संगम आजच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये घडून आला आहे.यातून महाराष्ट्रात एक पथदर्शी नवा इतिहास उभा राहिला आहे.
जांभुळणीत होणार पहिला सत्कार!
दिघंची येथे असे क्रांतिकारी पाऊल टाकल्याचे समजताच बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ व जांभुळणी गावच्या सरपंच सौ. संगिता मासाळ यांनी या क्रांतिकारी माता-भगिनींना पहिला सत्कार घेण्याचे नियोजन केले आहे. क्रांती ही अशा ठिकाणाहूनच होत असते आणि तिला बळ दिले पाहिजे, चालना दिली पाहिजे,प्रेरक म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे, असा मनोदय मासाळ दांपत्याने व्यक्त केला.
वयस्क महिलांच्या पायंड्याने नवतरुणींच्या मनधरणीला गती!
या ऐतिहासिक चळवळीमध्ये सहभागी झालेल्या महिला अगदी उतरत्या वयाच्या आहेत.अशा वयातील महिलांमध्ये सहाजिकच जुन्या रूढी, परंपरांचे बीज खोलवर रुजलेले असते.त्यामुळे परिवर्तनास अडथळे येऊ शकतात. त्यामानाने अकाली वैधव्य आलेल्या महिलांमध्ये अशा क्रांतीची बीजे सहजासहजी रुजण्यास सहज-सुलभ धारणा असते. त्यामुळे पुनर्विवाह, नवविचारानचे अवलोकन व अनुसरण सहजतेने होते. मात्र,उतार वयातही या सहा जणींनी सौभाग्याचं लेणं लेवून सर्वांसमोर नवा आदर्श पायंडा निर्माण केला आहे. त्यामुळे तरुण वयातील अशा महिलांना व मुलींना हे खूप प्रेरणादायक ठरणार आहे.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक