कपाळाला लावले कुंकू,पायात घातली जोडवी!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
नाशिक
अनिष्ट रुढींना मूठमाती देण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाने प्रेरीत होऊन कुप्रथांना पायदळी तुडवीत नाशिक येथील ७६ वर्षीय सुगंधाबाई त्र्यंबकराव चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल तेरा वर्षांनी कपाळावर लाल टिकली लावली,पायात जोडवे घातले व परंपरेच्या जोखडातून मुक्त झाल्या.याकामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत जात पंचायत विरोधी चळवळ उभा करणारे त्यांचेे पुुुुत्र कृष्णा चांदगुडे यांनी यासाठी विधायक दृष्टिकोन ठेवून प्रबोधित केले.
चांदगुडे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी आहेत.सध्या ते नाशिकच्या इंदिरानगर या भागात राहतात.सुगंधाबाई यांचे पती शेतकरी होते.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये जात पंचायत विरोधी चळवळ उभा करणारे नव्या विचारांचे प्रवर्तक कृष्णा चांदगुडे यांचे ते आई-वडील आहेत.
तेरा वर्षापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकरी असलेले त्र्यंबकराव चांदगुडे यांचे निधन झाले.त्यानंतर सुगंधाबाई चांदगुडे यांनी पती निधनानंतर समाजात चालत आलेल्या रुढी-प्रथेप्रमाणे जोडवी घातली नाहीत, टिकली लावली नाही, मंगळसूत्र घातले नाही.मुलगा मात्र पुरोगामी चळवळीत असल्यामुळे त्यांनी वडिलांचे श्राद्धकर्म करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवले होते.
महाराष्ट्र कितीही पुरोगामी असला तरी अनेक कुटुंबांमध्ये विधवा अनिष्ट प्रथा ही कायम आहेच.कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव संमत केल्यानंतर त्यालाच अनुसरून राज्य शासनाने १७ मे रोजी एक परिपत्रक काढले आहेे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद करणे संदर्भात ठराव करावा असे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेेत. या बाबीची माहिती समजताच पुरोगामी विचाराचे पाईक असलेले कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला याबाबतची सर्व माहिती सांगितली आणि प्रसिद्ध झालेल्या संबंधित बातम्या दाखवल्या.
अनिष्ट व कुप्रथांना मूठमाती देऊन परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी या ७६ वर्षीय मातेने आपल्या बुद्धीप्रामाण्यवादी मुलाची पुरोगामी विचारसरणी ऐकली. त्यांनी या समतावादी विचारधारेचे समर्थन करून तातडीने अनुकरणही केले. त्यांनी पायात जोडवी घातली, कपाळावर टिकली लावली आणि गळ्यात मंगळसूत्रदेखील घातले. त्या परंपरेची चौकट मोडून नव्या समतेच्या विचारात विलीन झाल्या.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणारे त्यांचे पुत्र कृष्णा चांदगुडे यांनी “परिवर्तन आपल्या घरातून झालं पाहिजे, मला वाटतं त्यामुळे मी असं पाऊल उचललं! ” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेरवाड पॅटर्न राज्यात विधायकदृष्टीने चर्चेत येत असतानाच राज्य शासनाने त्याची दखल घेतली. सामाजिक समतेसाठी सज्ज झालेल्या शासनाने गतिमान पावले टाकली. यापुढेही जाऊन सुगंधाबाई चांदगुडे यांनी आपल्या आचरणातून महाराष्ट्रपुढे यांचा नवा आधुनिक पायंडा पाडला. विचारांची लढाई अनुभवाने सिद्ध केली.
यामुळे समाज माध्यमांवरही या परिवर्तनवादी विचारांचे मोठे स्वागत व कौतुक होत आहे. अनिष्ट प्रथा झुगारून समतेचा नवा विचार रुजवत संविधानिक स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात अशी एक अनोखी क्रांतिकारी चळवळ फुलत आहे.या चळवळीला नि:संकोचपणे सर्वांनी बळ देण्याची नितांत मानसिक गरज बनली आहे.यातून भविष्यात नव्या विचारसरणीचा महाराष्ट्र निर्माण होणार आहे.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक