मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने

सादिक खाटीक, आटपाडी जि . सांगली
प्रदेश महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र .

प्रदेश कार्यकारणी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र .
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

खानापूर, आटपाडी विधानसभा मतदार संघातल्या पन्नाशी पार केलेल्या शेकडो लोकांमध्ये भैय्या नावाने सुपरिचित असलेले गुलाबराव तथा किरणरावभैय्या संपतरावनाना माने हे घरंदाज घराण्यातील, तितकेच घरंदाज नेते, आज पहाटे हे जग सोडून गेल्याच्या वार्तेने मनस्वी खुप दुःख झाले .

एक चारित्र्यसंपन्न, शांत, संयमी, सुस्वभावी, धाडसी, झुंजार नेतृत्व म्हणूनच त्यांनी दोन दशकापूर्वी पर्यंतची वाटचाल लोकाभिमुख ठेवली . त्याकाळात मी पत्रकारीता करीत असल्याने त्यांच्याशी असंख्य वेळा संबध आला . गप्पा, टप्पा, गुजगोष्टी, राजकीय स्थित्यंतरावरच्या चर्चा, त्यांच्या कार्यक्रमाची बातमी, पत्रकार परिषदेतला सुसंवाद, यापासून माझ्या घरी अनेक वेळा चहापाणी, जेवणाच्या अनुषंगाने माझ्याकडे आलेले भैय्या नेहमी जवळचे वाटायचे. साधारणतः १९८५ ते २००४ पर्यत सतत संपर्कात राहीलेल्या भैय्यांनी त्यापुढील दोन दशके राजकारणापासून अलिप्त रहात उर्वरीत आयुष्य व्यतित केले. घरात असणाऱ्या प्रचंड सत्तास्थानामुळे संपूर्ण जिल्हाभर नैतिक दरारा, प्रतिष्ठा पावलेल्या भैय्यांना उर्वरीत आयुष्यातील राजकीय विजनवासातले जीणे तसे त्रासाचेच गेले .

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै . वसंतरावदादा पाटील यांचे पहिल्या फळीतले निष्ठावान अनुयायी , दादांचे उजवे हात म्हणून ३० – ३५ वर्षे खानापूर, कडेगांव, आटपाडी तालुक्याच्या राजकीय क्षेत्राबरोबर सांगली जिल्हयात आदरयुक्त दरारा निर्माण केलेल्या नानांच्या कर्तृत्वसंपन्न सुपुत्रांमध्ये सदैव आघाडीवर राहीलेल्या किरणराव भैय्यांनी, नानांच्या सर्व गुण वैशिष्ट्यांचा कित्ता गिरवण्याचा नेहमीच प्रयत्न केला . तथापि एखादी खोटी बाब शंभर वेळा पुनः पुन्हा बोलत राहील्यास ती जनमाणसाला खरी वाटायला लागते . अशाच ग्लोबल्स नितीच्या तत्वाने नानांचा परिवार बदनाम करण्याचा विडा उचललेल्या अनेकांना रोखण्यात किंवा त्यावर मात करण्यास हा परिवार कमी पडल्याने हळू हळू जनमानसातील या सर्वांची पकड ढिली होत गेली . प्रसिद्धी, प्रचार, भुरळ घालणाऱ्या वक्तव्यांनी आणि पैशाच्या अमर्याद राजकीय वापराने या परिवाराला हतबल व्हावे लागले .

खानापूर आटपाडी मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ३ वेळा आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, मतदार संघातला साखर कारखाना, सुतगिरणी वगैरे अनेक संस्थांचे निर्माते राहीलेल्या संपतरावनाना माने यांनी, सात पिढ्या बसून खातील, प्रसंगी प्रत्येक पंचवार्षिक मध्ये करोडोंची उधळण करू शकतील, असे प्रचंड आर्थिक साम्राज्य निर्माण केले असते तर कदचित हाच परिवार या मतदार संघाचे सलग नेतृत्व करत राहीला असता . तथापि नेकी, सचोटी आणि विरक्त भावनेने राजकारण करण्याच्या त्यांच्या चांगुलपणाच्या वृत्तीचा, बारकाव्यांनी फायदा उचलणारे, या परिवाराला राजकीय क्षेत्रातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले . हे माने घराण्याचे मोठे दुर्देव .

आपल्या पित्याचा प्रचंड राजकीय वारसा जतन करीत दोन अडीच दशके संघर्ष करीत राहीलेल्या किरणभैय्यांच्या पदरी नेहमी मोठी उपेक्षाच आली . नानांच्या समवेत काम करताना बॅकेचे संचालक, जि . प . सदस्य अशा मर्यादित सत्तेवरून मोठ्या सत्येवर ते कधी झेपावु शकले नाहीत . वसंतरावदादा सारखा प्रचंड ताकदीचा मार्गदर्शक नानांच्या नेतृत्वाला आकार देवू शकला . तथापि किरणभैय्यांच्या पाठीशी एखादे मार्गदर्शक दादा उभे राहायचे दुरच तथापि अनेक वरिष्ठांनी किरणभैय्यांना दाबण्यासाठीच मोठी ताकद नेहमी पणाला लावली . त्यातूनच भैय्यांचे, माने घराण्याचे मोठे नुकसान झाले, राजकारणातले स्थान मागे ढकलले गेले . वास्तवीक विधानसभा, विधान परिषदेवर एखादी संधी भैय्यांना मिळाली असती तर ते निश्चितच राजकारणात सदैव पुढेच गेले असते .

सतत अधिकारवाणीने बोलणारे हास्य, विनोदाने अनेकांच्या दुःखावर फुंकर घालणारे, सामान्यांसाठी मतदार संघातल्या अनेक महत्वाच्या गावात, त्या गावच्या बाजार दिवशी त्या गावात तळ ठोकून त्यांची गाऱ्हाणी, प्रश्न, समस्या ऐकून जागेवरून तालुका, जिल्हा, राज्य लेवल पर्यतच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन लावून प्रश्नांची निर्गत जागीच करणारा नेता म्हणून किरणभैय्यांना आम्ही अनुभवले होते . वसंतरावदादांच्या घराण्यावर अभेद्य निष्ठा ठेवलेल्या भैय्यांनी, राष्ट्रीय नेते खासदार श्री . शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सतत संपर्कात राहण्याचा त्या काळी प्रयत्न केला होता . खानापूर आटपाडी तालुक्याचा शेतीच्या प्रश्न मार्गी लागावा, कृष्णेचे पाणी या मतदार संघातल्या गावागावात यावे यासाठीची त्यांची त्याकाळातली धडपड वाखाणण्यासारखी होती . या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी मोठ मोठे अधिकारी, पुढारी यांचे अनेक वेळा उंबरे झिजणारे भैय्या, पाण्यासारखे स्वच्छ, पारदर्शक, नितळ, गोडच भासत. राजेवाडी तलावाचा एक कालवा निंबवडे पर्यत काढला जावा, शेकडो एकर दुष्काळी जमीन ओलीताखाली यासाठीची अनेक वर्षाची भैय्यांची तळमळ आज अखेर सत्यात येवू शकली नाही हे दुर्देव आहे .

सामान्य माणूस केंद्रबिंदु मानून काम करणाऱ्या किरणराव भैय्यांना राजकारणातले छक्के , पंजे, करता आले नाही . स्वार्थी वृत्तीच्या कार्यकर्त्यांच्या आशा आकांक्षांना त्यांनी कधी भीक न घातल्याने राजकारणातल्या दुनियेतला हा सच्चा माणूस अनेकांच्या रोषाचा द्वेषाचा धनी झाला . तथापि आपल्या होत असलेल्या परवडीसाठी कोणाचे लांगूनचालून करणे अथवा चापलुसी करणे कधी किरणभैय्यांना जमले नाही .

जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा अंत ठरलेला आहे, हे सृष्टीचे वास्तव जरी खरे असले तरी मिळालेल्या आयुष्यामध्ये स्वाभीमानी, कणखर बाण्याने अनेक जीवनाचे आयुष्य जगण्याचे काम किरणभैय्यांनी केले . मोडेन पण कोणापुढे वाकणार नाही . हा बाणा आयुष्याचे ब्रीद म्हणून जगलेल्या आणि आमदार, नामदार म्हणून प्रचंड काम करण्याची पात्रता, कुवत अंगी असणाऱ्या या राजकारण्यातल्या अवलिया राजकारणी किरणभैय्यांना अखेरचा सलाम ! भैय्या तुम्हांला विधाता चिरशांती देवो! स्वर्गात स्थान देवो! ही प्रार्थना, दुवाँ !