विधवा कुप्रथांना मुठमाती देण्यास शासन सज्ज!

विधवांना सन्मानाने व समतेने जगण्याचा मनोमार्ग मोकळा !
ग्राम विकास विभागाने काढले परिपत्रक,‘हेरवाड’प्रमाणे ग्रामसभा ठराव घेण्याचे आवाहन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
मुंबई
महाराष्ट्र शासनाने १७ मे,२०२२ रोजी ‘समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्याबाबत’ परिपत्रक जारी केले आहे. विधवा अनिष्ट प्रथांना मूठमाती देऊन समतेची कावड नाचविण्यासाठी हेरवाड पॅटर्नचे अनुकरण करुत संबंध राज्याने विचारवंतांचा पुरोगामी वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने दिनांक ५ मे,२०२२ रोजी ग्रामसभा घेऊन समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबत ठराव सर्वानुमते मंजूर केला.याकामी ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर व सरपंच सुरगोंडा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत या ग्रामपंचायतीने केलेली ही कृती स्तुत्य आहे. आज विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेला सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज बनली होती. ही बाब लक्षात घेऊन विधवा प्रथा निर्मूलन होण्याच्या अनुषंगाने समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील सर्व संबंधितांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक १७ मे रोजी ‘समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथांचे निर्मूलन होणेबाबत’ शासन परिपत्रक जारी केले आहे.


या शासन परिपत्रकामध्ये म्हटले आहे की,‘आज एकविसाव्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे,गळ्यातील मंगळसूत्र तोडणे,हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे, यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते. या महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे आवश्यक आहे.
म्हणून या प्रथेचे पालन करणे अनुचित असून त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात यावी. या प्रकरणी जनजागृती होण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करणेबाबत सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सर्व अधिनस्त ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे. तसेच ग्रामपंचायत हेरवाड, जि. कोल्हापूर यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावाप्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ठराव घेणेबाबत प्रोत्साहित करावे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाही करावी’
असे या शासन परिपत्रकात म्हटले आहे.


हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.