खलाटी येथील गो आधारित सेंद्रिय शेती प्रकल्पाची डाॅ.अमृतानंद स्वामीजी यांनी केली पाहणी

पशुपालक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेण्याचे केले आवाहन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

जत तालुक्यातील बालगाव येथील गुरूदेव आश्रमचे मठाधिपती डाॅ.अमृतानंद स्वामीजी यांना गो आधारित सेंद्रिय शेतीची मोठी आवड आहे. त्यांनी बालगाव येथील गुरूदेव आश्रमात शेकडो देशी गाईचे पालनपोषण सुरू केले आहे. या देशी गाईपासून मिळणारे दूध, गो-मूत्र, शेण यापासून त्यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत.
नुकतेच त्यांनी खलाटी येथील शेतकरी सज्जन शिंदे यांच्या गो आधारित सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली.
शिंदे यांनी खलाटी येथे डोंगर भागात असलेल्या पाच एकर जमिनीवर गो- आधारित सेंद्रिय शेती केली असून त्यांनी या शेतामध्ये रसायनमुक्त शेती फाॅर्मुला वापरून तो यशस्वीही करून दाखवला आहे.
शिंदे यांनी सेंद्रिय पध्दतीने शेती करत या पाच एकर जमिनीवर पेरू, फ्लावर, बीट,ऊस,केळी व विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे चांगल्याप्रकारे उत्पादन घेतले आहे.
शिंदे यांनी या सर्व पिकांसाठी विषमुक्त पध्दतीने टिकून राहण्यासाठी संपूर्ण गो- आधारीत जीवामृत तयार करून त्याचा वापर खत म्हणून करून पिकांना दिले आहे व चांगले उत्पादन घेतले आहे.
डाॅ.अमृतानंद स्वामीजी यांनी या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांनी उपस्थित शेतकरी व पशुधन मालकांना आवाहन केले की, कोणीही यापुढे आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर करून पिके घेऊ नका, प्रत्येकाने गो- आधारित सेंद्रिय शेतीचा उपयोग आपल्या शेतामध्ये करून चांगल्याप्रकारे उत्पादन करावे असे आवाहनही केले. यापुढील काळात जर कोणाला गो- आधारित सेंद्रिय शेतीसाठी जी काही मदत लागेल, ती करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खलाटी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनी आपल्या शेतात पिकवलेली फळे,भाजीपाला व गूळ देऊन स्वामीजींचा सत्कार केला.