पोटचा गोळा आला घरी

पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला भारी!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन या देशात गेलेले जत तालुक्यातील तीन विद्यार्थी संकटातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे.राज्य व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
जत तालुक्यातील बिळूर येथील मनोज पिरगोंडा पाटील यांचे चिरंजीव डाॅ.यश पाटील , तिप्पेहळळी येथील गणपती शिंदे यांची मुलगी डाॅ.वैष्णवी शिंदे व जत येथील पवार मल्टीस्पेशालीटी हाॅस्पीटलचे डाॅ. पराग पवार यांचे चिरंजीव डाॅ. यशराज पवार हे युक्रेन या देशात वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी गेले होते.
परंतु रशिया व युक्रेन यांच्यामध्ये युध्द सुरू झाल्यामुळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. आपली मुले परदेशात युद्ध सुरू असलेल्या ठिकाणी अडकून पडल्याने त्यांचे पालक चिंतातूर व भयग्रस्त झाले होते.
त्यातच सांगलीचे जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी व जिल्हा पोलिस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी स्थानिक प्रशासनाचे माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याविषयी सविस्तर माहिती घेतली.
या माहीतीच्या आधारे राज्य व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी त्यांनी चांगल्याप्रकारे सहकार्य केल्याने आज युद्ध सुरू असलेल्या युक्रेन या देशातून जत तालुक्यातील हे तीनही विद्यार्थी सुखरूप मायदेशी परत आल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून राज्य व केंद्र सरकारचे तसेच स्थानिक मिडीयाचे आभार मानले आहेत.