कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज/जत :
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन सक्रिय झाल्यामुळे या विषाणूला रोखण्यासाठी देशभरात आणि राज्यात यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांनी जत शहरात लसीकरण केंद्रावर गर्दी
करायला सुरुवात केली आहे.
पहिली लाट ऑक्टोबर २०२० मध्ये ओसरली. या लाटेत कोणतीही प्रतिबंधात्मक लस नव्हती. जानेवारी २०२१ ला लस आली. हळूहळू लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक असा प्राधान्यक्रम ठरवून टप्प्या टप्प्याने
लसीकरण सुरू झाले. एप्रिलपर्यंत व्यवस्थितपणे लसीकरण सुरू होते. एप्रिलनंतर मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तसा लसीकरणाचा फज्जा उडू लागला. लस घेण्यासाठी पहाटेपासून लसीकरण केंद्राच्या दारात रांगा लागू लागल्या.
दुसरी लाट ओसरली आणि लसीकरणाबाबत लोकांत
बिनधास्तपणा आला. ‘जाऊ दे तिकडे’ आता कशाला लस घ्यायची, अशी मानसिकता बनू लागली. प्रशासनाने मात्र लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. ठिकठिकाणी गल्लोगल्ली शिबीर घेतले. लोकांमध्ये जनजागृती करून तिथेही लस घेण्यासाठी लोकांना भाग
पाडले. लस मुबलक प्रमाणात असूनही घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आता नव्या कोरोना व्हेरियंटचा शोध लागल्यानंतर आणि त्याचा प्रसार होऊ लागल्याचे लक्षात येताच सतर्कतेच्या सूचना दिल्या. त्यामुळे लसीकरण केंद्रावर पुन्हा गर्दी होऊ लागली.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर