गोपीनाथ मुंडे यांनी मागितलेली ओबीसी जणगणना मोदी का करत नाहीत?:विक्रम ढोणे

जत येथे रविवारी ओबीसी चर्चासत्राचे आयोजन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज/जत :

दिवंगत नेते, माजी केंद्रिय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. १२ डिसेंबर रोजी जत (जि. सांगली) येथे ओबीसी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ओबीसी विद्यार्थी, युवक, शासकीय कर्मचारी, तसेच सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे लोकसभेत उपनेते असताना त्यांनी जातनिहाय जगणनेची मागणी केली होती. त्यांच्यासोबत उत्तर भारतातील ओबीसी खासदारांनी हा विषय लावून धरला होता, मात्र मुंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पक्षाला ओबीसी जनगणनेच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. स्वतःला ओबीसी म्हणविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी जणगणनेविरोधात भूमिका घेत आहेत. त्यांच्या सरकारने ओबीसी जनगणनेच्या मागणीला स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. याच मुद्याच्या संदर्भाने राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेली माहिती सरकारकडे नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. या प्रश्नावर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जनतेला संभ्रमित करणारी माहिती देत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेचे प्रबोधन होण्यासाठी ओबीसी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मुंडे यांनी मागितलेली ओबीसी जणगणना मोदी का करत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर या चर्चासत्रातून मिळेल, असे ढोणे यांनी सांगितले.
जत येथील के.एम. हायस्कूल येथे रविवारी दि.१२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हे चर्चासत्र होणार आहे. जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांच्याहस्ते चर्चासत्राचे उदघाटन होईल. आरक्षण विषयाचे अभ्यासक एम.डी. चंदनशिवे हे अध्यक्षस्थानी आहेत. जतचे उपनगराध्यक्ष आप्पा पवार, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, माजी सभापती बसवराज बिराजदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार अमोल पांढरे, डॉ. प्रसाद ओंबासे, अॅड. आडव्याप्पा घेरडे, तुकाराम माळी, एन. के. हिप्परकर, अनिल मिसाळ, आदी चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.