अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
डफळापूर येथे २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी भारत बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोदी सरकारच्या कार्पोरेट धार्जिण्या धोरणाचा धिक्कार करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती.
दिल्ली बॉर्डरवर 3 कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, शेती मालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा, यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाला 10 महिने झाले आहेत.निष्ठूर मोदी सरकारने शेती कंपन्यांच्या दावनीला बांधण्याचे कारस्थान चालवले आहे, याचा निषेध करण्यासाठी डफळापूर येथील बस स्टँड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तीन कृषी कायदे रद्द करा,सोयाबीन आयात धोरण मागे घ्या, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या, महागाईला आळा घाला, NDRF च्या निकषांनुसार २०२० चा खरीप पिक विमा भरपाई वाटप करा,रेल्वे बँक, LIC, विमान इत्यादी सार्वजनिक संपत्ती व मालमत्तेचे खाजगीकरण थांबवा, सप्टेंबर २०२१ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागण्यांसाठी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कॉग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सांगली जिल्हा मार्केट कमिटी सदस्य अभिजित चव्हाण, मराठा सेवा संघाचे सुभाष गायकवाड, कॉ.हणमंत कोळी, युवा नेते हर्षवर्धन चव्हाण,बळीराजा शेतकरी संघटनेचे सागर चव्हाण,सावध पाटील, अमिर नदाफ, दिपक कोळी, सतिश शिंदे, जंरडीकर, राजु हरिगीरी,सुरज कोळी,संतोष बेळूंखी,यांच्यासह गावातील अनेक शेतकरी सामील झाले होते.

संबंधित बातम्या
गलाई बांधवच माणदेशाच्या आर्थिक विकासाचा कणा
तळेवाडी-आटपाडीच्या भाऊ-बहिणीची गरुडभरारी !
‘गाव लय भारी’!