“कमरेचं सोडून डोक्याला…” आ. पडळकरांची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टिका !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /मुंबई :
“माननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला! अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या काना-कोपऱ्यातून भोकं पडतील” अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा समाचार घेत खरमरीत टीका केली.
आ.पडळकर यावेळी म्हणाले,”आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोकं पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरताहेत? असं तर नाही की, राणेसाहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल’
“राणेसाहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता. मग पोलिसांना त्यांच्या आई-बहिणींवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल…?”
“ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघडं पाडले! पण तुम्ही आज त्यांचाच उदो…उदो… करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का?”
“हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारायंचं की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते?” अशा खरमरीत शब्दात पडळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.