उद्या दहावीचा ऑनलाइन निकाल होणार जाहीर!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ पुणे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा सन २०२१ चा निकाल उद्या शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर हा ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहेत. या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येणार आहे.
यासाठी मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे. http://result.mh-ssc.ac.in
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे कळविले आहे.
सन २०२१ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक/ अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली.
२८ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही.या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे आज कळविले आहे.