थकीत ऊस बिलासाठी 20 जुलै रोजी ‘स्वाभिमानी’चे भीक मांगो आंदोलन,बेमुदत ठिय्या
तासगाव शहरात मागणार घरोघरी भाकरी!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/तासगाव:
तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक २० जुलैपासून खा.संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले. तसेच तासगाव शहरात घरोघरी भाकरी मागून आंदोलन केले जाणार आहे.
खा. संजयकाका पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी या दोन्ही कारखान्याची बिले 15 जानेवारीपासून थकीत आहेत. बिले द्यावीत, यासाठी तीन आंदोलने झाली. मात्र केवळ तारखा देण्याचे काम करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पैशाची प्रचंड गरज असताना केवळ तारखा दिल्या जात आहेत. 21 जून रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या अगोदर व्यवस्थापक आर.डी. पाटील यांनी ऊस बिलाचे चेक दाखविले. सर्व बिले 15 दिवसात देतो, असे आश्वासन दिले. मात्र ती मुदतही संपली. चेक दाखविणे ही शुद्ध फसवणूक होती. त्यामुळेच आता जोपर्यंत बिले मिळणार नाहीत, तोपर्यंत उठणार नाही,अशी भूमिका घेवून मंगळवार दिनांक 20 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन, पाऊस नसेल तर खा. संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्डातील संपर्क कार्यालयासमोर आंदोलन होईल. मात्र पाऊस असेल तर तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
दुसऱ्या दिवसापासून तासगाव येथे घरोघरी भाकरी मागून जेवण,तसेच मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा तेथून कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे,अशी माहिती महेश खराडे यांनी दिली.अशोक खाडे, दामाजी डूबल, संदेश पाटील, शशिकांत माने, गुलाबराव यादव, भुजंगराव पाटील ,सचिन पाटील,महेश जगताप,राजेंद्र माने,संदीप शिरोटे , माणिक शिरोटे,धन्यकुमार पाटील, मुकेश चिंचवाडे पाटील, तानाजी धनवडे, सचिन महाडिक, अख्तर संदे सहभागी होणार आहेत.

संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे