जत एमआयडीसीचे अ वर्गात रूपांतर करण्यासाठी आ.विक्रमदादांनी उद्योगमंत्र्यांकडे प्रयत्न करावेत: उद्योजकांची मागणी

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ( लघु क्षेत्र) जत या क वर्ग  औद्योगिक वसाहतीचे अ वर्ग वसाहतीमध्ये रूपांतर करण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबतीत चर्चा करावी,अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे.  

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील उद्योगधंद्याना चालना मिळावी व चांगल्याप्रकारे उद्योगधंद्याना बाजारपेठ उपलब्ध व्हावी,यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने जत शहरालगत असलेल्या विजापूर-गुहागर या मार्गावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (लघु क्षेत्र ) उभारणी केली आहे.  

 या औद्योगिक वसाहतीकडे उद्योग भवनच्या जिल्हास्तरावरील अधिकारी यांचे नियंत्रण आहे.जत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक व्यावसायिकांनी आपले उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.यामध्ये दूग्ध व्यवसाय, टायर रिमोल्डींग व्यवसाय, फरशी व्यवसाय, तेल रिफायंडरी,हाॅटेल आदी व्यवसाय सुरू आहेत.   या औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या मूळ व्यावसायिकांच्या नावावर या वसाहतीमध्ये प्लाॅट आहेत.त्यापैकी बरेचजण हयात नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर ते प्लाॅट त्यांच्या वारसांना वारसा हक्काने मिळाले आहेत. 

  जत औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांशी प्लाॅट हे रिकामे आहेत.त्या प्लाॅटवर कसल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात आले नाही.हे रिकामे असलेले प्लाॅट वर्षानुवर्षे रिकामेच राहीले आहेत.तर येथील प्लाॅट अधिकृत ज्यांच्या नावावर आहेत,त्या व्यक्तींनी आपले प्लाॅट दुसऱ्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी भाड्याने दिले आहेत. तर काहीनी बेकायदेशीररित्या आपले प्लाॅट कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राने मोठ्या दुध संघाना व्यावसायासाठी दिले आहेत.  

 या औद्योगिक वसाहतीमध्ये अनुसूचित जाती या वर्गाच्या लोकांना तीन टक्के भूखंडाचे वाटप करावे,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यानी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती या वर्गाच्या लोकांना औद्योगिक वसाहतीमध्ये  तीन टक्के भूखंडाचे वाटप करण्याचे अश्वासन दिले होते.ते आश्वासन महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करावे अशी मागणीही कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांचा पाठपुरावा चालू आहे असे त्यांनी सांगितले.  

  जत एम.आय.डी.सी.मधील ज्या उद्योजकांनी आपले प्लाॅट काहीही बांधकाम न करता मोकळे ठेवले आहेत.तसेच ज्या उद्योजकानी आपले प्लाॅट बेकायदेशीररित्या अन्य व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत, अशा प्लाॅटमालकांची  उद्योगभवनकडून चौकशी सुरू करण्यात आली असून यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्या मालकीचे प्लाॅट त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील, अशी माहिती याठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक यांनी दिली आहे.  

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे यांनी तर जत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जिल्हा उद्योगभवन अधिकारी यांच्या संमतीने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असून या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समिती नेमून समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे,तसेच जे व्यावसायिक व्यवसाय न करता केवळ जागा ताब्यात घेऊन त्या जागा परस्पर विकणे तसेच भाड्याने देणे,कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राने वर्ग करणे अशा प्लाटधारकांची चौकशी झाली पाहिजे व जत येथील एम.आय.डी.सी.चे सद्या असलेल्या क वर्ग एम.आय.डी.सी.चे रुपांतर अ वर्ग एम.आय.डी.सी.मध्ये होण्यासाठी जतचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी,अशी  मागणीही कांबळे यांनी केली आहे.