वंचित बहुजन आघाडीची करगणी येथे उत्तर विभागाची बैठक संपन्न

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार:नूतन जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/करगणी:     

वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटीची आटपाडी तालुक्याची बैठक करगणी येथे संपन्न झाली.नूतन तालुका कार्यकारिणी व बूथ बांधणी करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीला लागण्याच्या सूचना नूतन जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिल्या.     

 नूतन जिल्हा कार्यकारिणीमध्ये आटपाडी तालुक्यातील चार पदाधिकाऱ्यांचा समावेश केला असून तालुक्यातील कार्यकारिणी नव्याने नियुक्त करण्यात येणार असल्याने सदर बैठकीचे आयोजन तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.या बैठकीस करगणी, झरे, घरनिकी, गोमेवाडी, विठ्ठलापूर, हिवताड, आवळाई, तडवले, खरसुंडी, राजेवाडी, उंबरगाव, शेटफळे, दिघंची, कौठुळी यासह तालुक्यातील अन्य गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.    यावेळी जिल्हा महासचिव अमित वेटम म्हणाले, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास आटपाडी तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवला जाईल.तसेच यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू कांबळे, सदस्य शिवाजी खैरमोडे, विद्याधर कांबळे, मुरली बनसोडे, शैलेंद्र ऐवळे, आबासो काटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.   

 या बैठकीस राखीताई खरात, संतोष वाघमारे, स्वाती सवने, भीमराव कदम, विनोद पवार, रविकांत सोहनी, आशिष पवार, ऋषिकेश निंबाळकर, अजय कांबळे यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.