
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/तासगाव: तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत ऊस बिले तातडीने द्या,या मागणीसाठी सोमवारी तासगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून खा.संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर धडक मारण्यात आली. शुक्रवारी बिले खात्यावर वर्ग करू अशी ग्वाही खा.संजयकाका पाटील यांनी दिली.दरम्यान शुक्रवारपर्यंत बिले न दिल्यास काकाच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. तासगाव व नागेवाडी कारखान्याने जानेवरपासून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली नागेवाडी कारखान्यावर 16 एप्रिल रोजी आंदोलन केले होते.त्यावेळी खा.संजयकाका पाटील यांनी 30 एप्रिलपर्यंत बिले देतो असे सांगितले होते. मात्र दीड महिना उलटून गेला तरी अद्याप बिले दिली नाहीत. त्यामुळे सोमवारी तासगाव येथील चिंचणी नाका येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर मोर्चाने सर्व शेतकरी खा.संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्डातील संपर्क कार्यालयासमोर आले. याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘बुडव्या साखर सम्राटाच्या करायचे काय? खाली मुंडी वर पाय’, ‘ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘एकच गट्टी,राजू शेट्टी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाला. खते ,बी ,बियाणे यासाठी पैशाची गरज आहे. पण हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यासाठी कारखानदारांच्या दारात जावून भीक मागावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. हक्काच्या दामासाठी संघर्ष करावा लागत आहे. पण आता आम्ही अटीतटीची लढाई करू. ऊस बिल पदरात पाडून घेवू.संजयकाका यांना याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दोनदा खासदार केले. पण त्यांनाच ठेंगा दाखविण्याचे धोरण ते घेत आहेत.त्यांनी तातडीने बिले द्यावीत,अन्यथा त्यांच्या बंगल्यासमोर बेमुदत ठिय्या मारू,असा इशारा देत आहोत. यावेळी तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव यांनीही मार्गदर्शन केले.

त्यानंतर कारखान्याचे व्यवस्थापक आर.डी.पाटील हे आंदोलन स्थळी आले. मोबाईलवरून खा. संजयकाका पाटील व महेश खराडे यांच्यात चर्चां झाली. शुक्रवारपर्यंत बिले देण्याची ग्वाही दिली. यावेळी राजेंद्र माने,अशोक खाडे, दामाजी डबल, शशिकांत माने, संदेश पाटील,सचिन पाटील, महेश जगताप, अनिल पाटील, सुरेश पाचिब्रे,अख्तर सन्दे, तानाजी धनवडे, विनायक पवार,सिद्धू जाधव, प्रा .जगदाळे, प्रदीप लाड, शिवाजी भोसले, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन