गजीढोलातील माणदेशी ‘ढोल्या’ हरपला!

लिंगीवरे येथील मारुती संभू खटके यांचे निधन

कविता यादव

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /दिघंची:

माणदेशातील गजीढोल खेळात नावलौकिक मिळवलेला लिंगीवरे येथील ‘ढोल्या’ पक्षाघाताच्या आजारात उपचारादरम्यान हरपला.मारुती संभू खटके यांचे गुरुवारी पहाटे पाच वाजता निधन झाले.

माणदेशात गजीढोलाचा खेळ प्रसिद्ध आहे.आटपाडी, माण, सांगोला, माळशिरस, कवठेमहंकाळ, वडूज खटाव या तालुक्यांमध्ये गजनृत्याचा खेळ पारंपारिक पद्धतीने खेळला जातो. या खेळाचे यात्रा, उरुस व अन्य धार्मिक कार्यक्रमावेळी मोठ्या हौसेने फड भरवण्यात येतात. माणदेशी कला-संस्कृतीत या खेळाला एक आगळेवेगळे स्थान आहे.माणदेशातील काही गावांमधील ठराविक ढोल्यांनी ढोल वादनामध्ये आपले नाव कमावले आहे. त्यापैकीच लिंगीवरे येथील मारुती संभू खटके यांची ख्याती माणदेशात आहे.

गजनृत्य परंपरा टिकवून ठेवून हा खेळ पुढे वाढावा म्हणून त्यांनी ढोलवादनातील नवीन ढोले तयार करण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नातून अनेकांनी ढोलवादन कला आत्मसात केली आहे.परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांना ही कला जोपासताना मर्यादा येत होत्या. तरीही त्यांचा गजनृत्यात ढोल वादनाचा छंद अंगात भिनला असल्यामुळे फडांवर ढोल वाजवण्यासाठी ते तत्पर असायचे.

अलीकडील काळात वयोमानाने प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांचा ढोल सुटल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.सोमवारी सकाळी त्यांना  पॅरालीसीसचा  झटका आला. त्यावर त्यांना उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु गुरुवारी पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने माणदेशातील गजनृत्य मंडळांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून एका दर्जेदार ढोल्याला माणदेश मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शनिवार दिनांक ५ जून रोजी लिंगीवरे येथे covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.