
नगर जिल्ह्यात मे महिन्यात 9928 बालके कोरोनाबाधित!पालघरमध्ये नवजात बालकालाही लागण;माता मात्र निगेटिव्ह!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अहमदनगर:
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी होत नाही, तोपर्यंत आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळाले आहेत. तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये 80 हजार 785 लोकांना संसर्ग झाला.कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमध्ये 11.65 टक्के रुग्ण 18 वर्षाखालील कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. नगर जिल्ह्यात मागील तीन महिन्यांमध्ये सुमारे 18 हजार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मे महिन्यामध्ये 9928 बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे.यामुळे कोरोनाची तिसरी लाट धोकादायक असल्याचा तज्ञांचा अंदाज खरा ठरू लागला आहे. गेल्या तीन महिन्यात लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. एक वर्षाखालील 85 मुले बाधीत सापडली आहेत. त्यामुळे लहान मुलांनाही आता कोरोनाचा विळखा बसला आहे. या अनुषंगाने टास्क फोर्स व तज्ञांच्या दोन बैठका आयोजित करण्यात आल्या.दरम्यान 2 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरण चाचणीची कालपासून सुरुवात करण्यात आली आहे.पालघर मधील सफाळे येथील टेकरी पाडा येथील नवजात अर्भकाला कोरोना ची लागण झाली आहे.जन्माला आल्यानंतर बारा तासानंतर त्याची अँटीजन चाचणी करण्यात आली. ही चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मात्र त्याच्या मातेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या नवजात बालकाची आई पालघर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.या नवजात बालकाला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. तिसऱ्या लाटेच्या संकेताच्या या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.कोरोणाच्या तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असणारा धोका आता जाणवू लागला आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर