प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द केल्याचे शिक्कामोर्तब करून निकालाबाबतचा फाॅर्मूला जाहीर करण्यात आला आहे. नववी व दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जूनअखेर घोषित करण्याचे नियोजन आहे.दहावीची परीक्षा रद्द करून प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करताना नववी व दहावीमधील अंतर्गत गुणांचा विचार केला जाणार आहे.विद्यार्थ्याचे दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुणांचे, विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांच्याआधारे 20 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्याचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल 50 गुण असे एकूण प्रत्येक विषयाचे 100 गुण विचारात घेतले जाणार आहेत. इयत्ता नववीच्या संपादणूकीसाठी 50% भारांश व दहावीच्या संपादणूकीसाठी 50 टक्के भारांश ठरवण्यात आला आहे.शिक्षण विभागातील तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या, लोकप्रतिनिधी यांच्याशी जवळपास 24 विविध बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाने ठरविलेल्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर सात सदस्यांची निकाल समिती मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून या निकालपत्राच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर केली जाणार आहे. जून 2021 अखेर मंडळामार्फत निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश