अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
टाटा पॉवर कंपनीच्या पवन उर्जा विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय जत येथे चार ऑक्सिजन बायपॅप मशीन व कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप करण्यात आले. ऑक्सिजन बायपॅप ही मशीन कोरोना महामारीत प्राणवायू निर्माणकर्ता म्हणुन योगदान देत असून ऑक्सिजन पातळी खाली आलेल्या रूग्णांना फायदेमंद ठरणार असल्याचे प्रतिपादन जतचे आमदार विक्रम सावंत यांनी व्यक्त केले.
टाटा पॉवर कंपनी करीत असलेल्या सीएसआर प्रकल्पामुळे जत व आसपासच्या ग्रामीण भागात त्याचा चांगलाच फायदा झालेला आहे. बचत गट, समाधान मेळावा, शासन आपल्या दारी व जलसंधारणाच्या कामामुळे आमुलाग्र बदल होताना दिसतो आहे,असे प्रतिपादन जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांनी व्यक्त केले.
आमदार विक्रम सावंत यांनी कोरोना प्रतिबंधक कामाचे कौतुक केलं. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांना कोरोना कालावधीत धीर व मानसिक आधार दिला तर होणारी हानी निश्चितच टाळता येईल.
टाटा पॉवर कंपनीचे सीएसआर अधिकारी विश्वास सोनवले यांनी सांगितले की, सदर उपक्रम हा टाटा पॉवर कंपनीच्या समाजकल्याण विभागामार्फत होत असून अशा परिस्थितीत हे सयंत्र लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करेल. साईट इन्चार्ज साहेबराव पुजारी ह्यांनी सांगितले की, टाटा समूह हा नेहमीच आपल्या लोकांना मदत करतो. प्रा.तुकाराम सन्नके म्हणाले कि, टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून देवनाळ गावचा सर्वांगीण विकास झाला असून पाणी, महिला सक्षमीकरण, सेंद्रिय शेती इत्यादी गोष्टींवर काम झाल्याने सुधारणा झाल्या आहेत.
तहसिलदार सचिन पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, ग्रामसेवक कामेश्वर एेवळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर